esakal | उद्योगक्षेत्रापासून ते कृषिक्षेत्राला लाॅकडाउनचा फटका; मात्र यात फुलशेतीचे काय झाले?...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

flower plant in buldana.jpg

मेहकर तालुक्यात बरेच शेतकरी फुलशेतीकडे वळले आहे. या फुल शेतीतून त्यांना एक ते दीड लाखाचे उत्पन्न होत होते.

उद्योगक्षेत्रापासून ते कृषिक्षेत्राला लाॅकडाउनचा फटका; मात्र यात फुलशेतीचे काय झाले?...वाचा

sakal_logo
By
संतोष थोरहाते

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंचा कहर संपूर्ण जगावर दिसून येत आहे आणि त्यांचा फटका संपूर्ण उद्योगक्षेत्रापासून ते कृषिक्षेत्राला सुद्धा बसत आहे. कोरोना विषाणूमुळे शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन डबघाईला आले आहे. 

मेहकर तालुक्यात बरेच शेतकरी फुलशेतीकडे वळले आहे. पीक हाताशी आले असताना अचानक ताळेबंदी करण्यात आल्याने त्यांच्या शेतातील संपूर्ण फुले सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी फुल उत्पादक शेतकर्‍यांमधून होत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! आता लक्षणं नसतानाही आढळत आहेत कोरोनाचे रुग्ण

मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील फुल शेतकरी विलास लहाने, कैलास लहाने या शेतकर्‍यांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले असून याची सरकारने दखल घ्यावी. या फुल शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतामध्ये मोगरा, निशिगंधा, लिली व गॅलार्डिया फुलांची लागवड एक एकर शेतामध्ये केली होती. विलास लहाने, भाऊ कैलास लहाने व ऋषिकेश लहाने हे आपल्या शेतातील फुलाचे हार करून लव्हाळा, मंगरूळ नवघरे, हिवरा आश्रम पेनटाकळी गाजरखेड, पिंपळगाव काळे, कळंबेश्वर येथे विक्री करीत होते.

आवश्यक वाचा - कोरोनाने मारले अन् या व्यवसायाने तारले, लाॅकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांना मिळतोय रोजगार

या फुल शेतीतून त्यांना एक ते दीड लाखाचे उत्पन्न होत होते मात्र लॉकडाऊनमुळे फुलशेतीचे नुकसान झाल्यामुळे अत्यंत हालाखीची परिस्थिती शेतकर्‍यावर आली आहे. मार्च व एप्रिल महिन्यामध्ये विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलाची मागणी असते. मात्र फुलांना मागणी नसल्यामुळे फुलांची नासाडी होत आहे. फुल शेतकर्‍याला आर्थिक मदत करावी अशी मागणी फुल उत्पादक शेतकरी करीत आहे.

मोठे आर्थिक नुकसान
दरवर्षी फुलशेतीतून मोठया प्रमाणात आर्थिक फायदा होतो. विविध समारंभ, वाढदिवस, विवाह सोहळे इत्यादी कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात फुलांची मागणी होते. त्यामुळे यावर्षी अधिक फुलांची लागवड केली होती. कोरोनामुळे फुलशेतीमध्ये केलेली मेहनत व आर्थिक गुंतवणूक व्यर्थ गेल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
- विलास सदाशिव लहाने, फुलशेती शेतकरी, लव्हाळा

शेतकर्‍याचे स्वप्न भंग
फुलशेतीतून शाश्वत व हक्काचे आर्थिक पाठबळ मिळेल यासाठी अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहे. मात्र कोरोना विषाणुमळे शेतक-याचे स्वप्न भंग झाले. सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण बाजारपेठा सोबत मंदिर बंद झाली. विविध समारंभ सुद्धा रद झाले. यामुळे शेतकर्‍याला मोठे आर्थिक नुकसान होत आहे.