वेदनांच्या भागीदारांनी केली अश्रूंची फुले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

गोंडपिपरी (चंद्रपूर) : दोघेही पती-पत्नी मोलमजुरी करून संसाराचा रथ आनंदाने ओढत असतानाच त्यांच्या कुटुंबात आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले. या नव्या पाहुण्याने गरिबीच्या चटक्‍यांचाही त्यांना विसर पडला. मात्र, हे सुख फार काळ टिकले नाही. नव्या चिमकुल्या जिवाला गंभीर आजार असल्याचे निदान झाले आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याच्या उपचारासाठी धडपड असताना देवदूताच्या रूपात एकाची भेट झाली आणि "त्या' चिमुकला जिवाची गुदमरलेल्या श्‍वासातून सुटका झाली.

ऋषिराज शेंद्रे नागपुरातील चंद्रमणीनगरात वास्तवाला आहेत. पत्नी लक्ष्मी अन ऋषीराजाच्या उदरनिर्वाहाचे साधन मोलमजुरी आहे. या दोघांच्या संसारात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. लक्ष्मीने एका बाळाला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन्म दिला. नव्या बाळाचे "दीप' असे नामकरणही त्यांनी केले. मात्र, जन्मत:च दीपची प्रकृती बरी राहत नव्हती. उपचारालाही तो प्रतिसाद देत नव्हता. त्याला हृदयाचा आजार असल्याचे निदान एका खासगी रुग्णालयात तपासणी अंती झाले. उपचारासाठी लाखोंचा खर्च डॉक्‍टरांनी सांगितला. हाता-तोंडाची रोजच गाठ पडणाऱ्या या दांपत्याला तेवढा खर्च करणे शक्‍यच नव्हते.
दरम्यान, शासन उपचारासाठी मदत करते, अशी माहिती त्यांना मिळाली. जिल्हा शल्यचिकित्सकाच्या कार्यालयासमोर मदतीसंदर्भात विचारणा करायला गेला असता ऋषिराजची भेट जिल्हा समन्वय अधिकारी अमोल खोब्रागडे यांच्याशी झाली. त्याने अमोलला आपबिती सांगितली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत आपल्या बाळाची शस्त्रक्रिया होऊ शकते, असा सांगत धीर दिला. वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉ. सचिन कुटे यांच्याशी संपर्क करून वीस दिवसांच्या दीपविषयी माहिती दिली. तेथे दीपला भरती करण्यात आले. परंतु, योजनेच्या लाभातील निकषात तो बसत नव्हता. तेव्हा नागपूरचे जिल्हा शल्यविशारद डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी पुढाकार घेतला. त्रुटी दूर करून निधीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानंतर दीपवर यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. कुटे यांनी केली. आता दीपची प्रकृती चांगली आहे. ऋषिराज व लक्ष्मी यांच्या वेदनांचा भागीदार होत अमोल यांनी त्यांच्या आयुष्यात अश्रूंची फुले केलीत. शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्यावर अमोल खोब्रागडे आणि डॉ. अश्विनी बुजाणे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अमोल खोब्रागडे यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे व कार्यतत्परतेमुळे 20 दिवसांच्या दीपच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकली, असे डॉ. पातूरकर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers of tears made by partners of pain ...