रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाच्या राइसमध्ये माशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

वर्धा मार्गावरील कृष्णम रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाच्या फ्राईड राईसमध्ये प्रथम झुरळ आणि त्यानंतर माशी निघाल्याची तक्रार शनिवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)कडे आली. ‘एफडीए’कडून हॉटेलची तपासणी करण्यात आली.

नागपूर - वर्धा मार्गावरील कृष्णम रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाच्या फ्राईड राईसमध्ये प्रथम झुरळ आणि त्यानंतर माशी निघाल्याची तक्रार शनिवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)कडे आली. ‘एफडीए’कडून हॉटेलची तपासणी करण्यात आली. दरम्यान त्या ग्राहकाकडून हॉटेल मालकाला एक लाख रुपयांची मागणी करणारी ध्वनीफीत व्हायरल झाल्याने या तक्रारीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले.

शहरातील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये कृष्णमची ख्याती आहे. येथे शुक्रवारी एका ग्राहकाने मागवलेल्या दह्यात माशीसदृश वस्तू निघाल्याची तक्रार एफडीएकडे आली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास येथे नाश्‍ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने फ्राईड राईस मागवले. त्यात प्रथम झुरळसदृश वस्तू निघाली. त्याने हॉटेल मालकाकडे तक्रार  केल्यावर त्याला दुसरे फ्राईड राईस देण्यात आले. त्यातही त्यांना माशीसदृश वस्तू दिसली. त्यानंतर या ग्राहकाने तेथे गोंधळ घातला. ही तक्रार ग्राहकाकडून थेट एफडीएच्या अन्न शाखेकडे केली गेली. त्यावरून रात्री एफडीएचे पथक तपासणीसाठी पोहचले. एफडीएकडे तक्रार करण्यापूर्वी संबंधित ग्राहकाने हॉटेलच्या मालकाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. याप्रसंगी प्रकरण मिटवण्यासाठी एक लाखाची मागणी केली गेली. हॉटेल मालकाने हे संभाषण रेकॉर्ड केले. मालकाकडून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याने या ग्राहकाच्या तक्रारीच्या विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. दरम्यान हॉटेलमालकाने धंतोली पोलिस ठाणे गाठून ग्राहकाविरुद्ध माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत एफडीए आणि पोलिसांकडून तक्रार नोंदणीबाबत कार्यवाही सुरू होती. ग्राहकाने लाच मागण्याबाबतच्या प्रकरणाला क्रृष्णम रेस्टॉरंटचे शशांक हरदास यांनी दुजोरा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fly found in the customers in Rice