टेकडी उड्डाणपूल तत्काळ पाडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

टेकडी उड्डाणपूल तत्काळ पाडा
नागपूर : रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौकात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रामझुलाची लांबी केपी ग्राउंडपर्यंत वाढवण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी अडीचशे कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचे सांगून महापालिकेला पूल तोडण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करण्यास सांगितले.

गडकरी यांनी आज शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात घेतला. या वेळी त्यांनी महापालिकेतील कामाच्या संथ गतीवर अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. जयस्तंभ चौकात तीनही बाजूने येणारे रस्ते एकत्र येत असल्याने येथे चांगलीच गर्दी होते. त्यामुळे रामझुल्याची लांबी ऍलीव्हेडेट पद्धतीने केपी ग्राऊंडपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सोबतच खालचा रस्ताही रुंद केला जाणार असून येथील दुकानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दुसरीकडे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलामुळे गैरसोयच अधिक होत असल्याने तो पाडण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सभेत महापालिकेच्या सभेत हा पूल पाडण्याचा ठराव करणार आहे. येथील दुकानदारांचेही जवळच पुनर्वसन करण्यात येणार आहे. हा रस्ता आणखी रुंद करण्यासाठी मध्य प्रदेश बसस्थानक, राज्य परिवहन मंडळ तसेच मॉर्डन स्कूलची जागा अधिग्रहित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

आणखी एक लोखंडी पूल
कॉटनमार्केट चौकात मेट्रोच्या रेल्वे स्थानकामुळे गर्दीत आणखी वाढ होणार आहे. यामुळे लोखंडी पुलाच्या शेजारीच आणखी एक पुशबॉक्‍स पद्धतीने आरयूबी तयार केला जाणार आहे. याशिवाय फुले मार्केट तसेच परिसरातील जागेवर व्यावसायिक संकुल उभारून एकात्मिक बाजारपेठ निर्माण केली जाणार आहे. आजूबाजूच्या दुकानदारांचे याच बाजारात पुनर्वसन केले जाणार आहे. ज्याची जेवढी जागा त्याला तेवढ्या जागेचे दुकानाचे गाळे येथे दिले जातील. गोळीबार चौक ते कमाल चौकापर्यंतही पूल पाडण्यात येणार असून प्रशस्त पुलाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी बैठकीत दिले.

Web Title: flyover demolize immediately