
चिखली, : येथील शिवाजी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या मुलींच्या शासकीय वसतीगृहातील मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ता. 22 रोजीच्या मध्यरात्री समोर आली होती. सहा मुलींना अस्वस्थ वाटु लागल्याने रात्रीच एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या सहाही मुलींवर वैद्यकीय उपचार सुरू असून 5 मुलींची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
याठिकाणी वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिखली शहरातील मध्यवर्ती भागात मागास वर्गीय मुलींचे डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह आहे, या वसतीगृहात ब-याच मुली राहतात. तर या वसतीगृहातील मुलींना ब-याचवेळा निकृष्ट दर्जाचे जेवन दिल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
२२ सप्टेंबर रोजी रात्री मुलींनी जेवन केले. त्यानंतर यातील सहा मुलींना अस्वस्थ वाटु लागल्याने त्या मुलींना मध्यरात्री खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुलींना दिलेल्या जेवनात अळ्या असल्याने ते अन्न मुलींनी खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले.
या घटनेचे वृत्त समजताच आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार तथा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी रूग्णालयात जात मुलींची विचारपूस केली. या वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या ह्या सर्व मुली बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसाधारण शेतक-यांच्या मुली आहेत. तर त्यांना रूमभाडे व मेस परवडत नसल्याने ह्या मुली वसतीगृहात प्रवेश घेऊन राहतात.दरम्यान, या विषबाधेप्रकरणी चिखली पाेलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. या घटनेची उच्चस्तरीय चाैकशी करावी, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे आली आहे.
वसतीगृहाकरिता राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग लाखो रूपयांचा खर्च करीत असते. मात्र मुलींना अळ्या पडलेले तसेच शिळे अन्न खाण्याकरिता बाध्य केले जात असल्याचे या घटनेमुळे समोर आले असून वसतीगृह अधिक्षिकेसहर संबंधीत प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
वस्तीगृह अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवणार: आ. महाले
या वस्तीगृहातील अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्या आरोग्याची अक्षम्य हेळसांड होत असल्याचे लक्षात आले आहे. हा प्रकार मुळीच खपवून घेतला जाणार नाही. एकीकडे " बेटी बचाव बेटी पढाव " अभियान शासनाद्वारे चालले जात असताना शासनाचेच काही कर्मचारी जर मुलींच्या जीवावर उठत असतील तर ही गंभीर दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. या प्रकरणी लक्ष घालून संबंधित वस्तीगृह अधीक्षकांना सत्तेवर सक्तीचे राजेवर पाठवण्याची मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती आ.महाले यांनी दिली आहे.
मुलींना विषबाधा झाल्याचे समजातच तातडीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अनावधानाने स्वयंपाकीकडून ही घटना घडली आहे. मात्र या घटनेकरिता जबाबदार असणार्यांवर वरिष्ठांच्या सल्ल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-सौ.जोशी मॅडम, अधिक्षिका,शासकीय वसतीगृह, चिखली