एक चवदार बातमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बाजारात आलाय रानमेवा
आहारतील ‘रंगत’ आणि ‘चव’ वाढली

अकोला : दररोजच्या आहाराला ‘रंगत’ आणि ‘चव’ आणणारा तऱ्हे तऱ्हेचा रानमेवा अकोला शहराच्या बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे भाजीबाजाराचीही रंगत वाढली आहे. हा रानमेवा खेड्यापाड्यातून आणणाऱ्या ग्रामिण शेतकऱ्यांना या रानमेवा विक्रीतून चांगले उत्पन्न ही मिळत आहे.

 

सध्या शहरातील भाजीबाजार वैशिष्टपूर्ण अशा रानमेव्याच्या आगमनाने खुलून आला आहे. नेहमीच्या भाजीपाल्यासोबत हा रानमेवा आहाराची लज्जत वाढवित आहे. शहराच्या भवतालच्या खेड्यातून हा रानमेवा बाजारात आणला जातो. एरवीच्या भाजीबाजारापेक्षा चोखंदळ ग्राहक हा रानमेवा घेणे अधिक पसंद करतात.  सध्या बाजारात नेहमीच्या तुरीच्या शेंगा, आवळे, बोरं, पेरू यांसोबत अंबाडीची फुलं, बोरुची फुलं, हादगा अथवा हेट्याची  फुलं, कुयरीच्या शेंगा, ज्वारीचा हुरडा इ. प्रकारचा रानमेवा दाखल झाला आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरणारा हा रानमेवा हातोहात विकला जातो. विक्रेताही खुशालीने माल विकून घराकडे रवाना होतोय. रानमेवा हा विशिष्ट कालावधीतच उपलब्ध असतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत येणारी फळे, फुले वा शेंगा यासारख्या उत्पादनातून आहार घटक व नैसर्गिक चवदारपणा यात असतो. आरोग्याला हा आहारही उत्तम असतो. 

 

अंबाडीची फुलं : ही  गोड आंबट चवीची, त्यांचा आकर्षक लालचुटूक रंग हा लक्षवेधक असतो. त्याच्या पाकळ्या बाजूला करुन आतलं बोंड वेगळं केलं जातं. पाकळ्यांची चविष्ट चटणी होते शिवाय अधिक काळ टिकणारे जॅमही केले जाते. सध्या अंबाडीच्या फुलांचा भाव 30 रुपये प्रति पाव किलो आहे. अंबाडीची फुलं, तसेच पानांचीही भाजी करतात. शिवाय ही पाचक असून पित्त व अपचनाच्या विकारावर गुणकारी मानली जातात. या फुलांचे सरबतही केले जाते. उन्हाळ्यात ते अत्यंत गुणकारी मानले जाते.

Image may contain: plant and food

कुयरीच्या शेंगा : कुयरीच्या शेंगा ह्या खऱ्यातर खाज आणणाऱ्या शेंगांच्या खाज कुयरी या झाडाच्या कुटूंबातील दूरचे नातेवाईक. पण ह्या शेंगांनी खाज येत नाही. शिवाय त्यात लोह भरपुर प्रमाणात असतं. ह्या शेंगा कच्च्या आहारात खाल्ल्या जातात. त्यांचाही भाव हा 30 ते 50 रुपये पाव किलो याप्रमाणे आहे. आहारातील महत्त्व पाहता ह्या शेंगा महिला व लहान मुलांनी खाणे अत्यंत आवश्यक मानले जाते. विविध प्रकारात या शेंगा त्यातल्या बिया यांचा आहारात समावेश केला जातो.

बोरुची फुलं - हिरव्या आवरणात दडलेली पिवळी धम्म फुलं म्हणजे बोरुची फुलं. सामान्यपणे ज्याला घायकुत ही म्हणतात त्याची ही फुलं. घायकुताच्या फांद्यांपासून निघणाऱ्या मजबूत धाग्यांचे शेतीकामासाठी लागणारे दोर इ. साहित्यही बनवतात. हि फुलंही खूप चविष्ट असतात. त्यांची चटणी अथवा भाजी केली जाते. चनाडाळीचे पीठ पेरुन केलेली या फुलांची भाजी खूप चवदार लागते.

Image may contain: flower, plant and food

हादगा अथवा हेटा- या झाडाला काही जण अगस्तीचे झाड या नावानेही ओळखतात. हादग्याच्या मऊसूत पांढऱ्या फुलांचे ढिगारे बाजारात लगेच लक्ष वेधतात. या फुलांचीही भाजी अथवा चटणी बनवून आहारात समाविष्ट केली जाते. हादग्याच्या फुलांची भजी ही बनवतात. या फुलांच्या सेवनातून अ आणि ब जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळते. या झाडाचे लाकूड हे आगपेटीच्या काड्या बनविण्यासाठीही वापरतात. सध्या हा हादगा 20 ते 30 रुपये पावकिलो या दराने उपलब्ध आहे.

Image may contain: plant, food and nature

ज्वारीचा हुरडा- ज्वारीचा हुरडा हा बहुतेकांचा विक पॉईंट. पण सध्या हा हुरडा बाजारात येतोय तो थेट अहमदनगर जिल्ह्यातून. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत बहुतेक ठिकाणी ज्वारी काळी पडली. त्याचा फटका स्थानिक हुरडा उपलब्धतेला बसला. मात्र बाहेर जिल्ह्यातून येणारा हा हुरडा खवय्यांच्या दिमतीला हजर आहे. ज्यांनी रब्बी ज्वारी घेतली त्यांच्याकडे हुरडा अद्याप उपलब्ध व्हायचा आहे. सध्या हुरडा हा 80 रुपये पाव किलो या दराने विकला जातोय.

Image may contain: food

तुरीच्या शेंगा - तुरीच्या शेंगाही बाजारात मुबलक आल्या आहेत. 30 ते 50 रुपये प्रति पावकिलो या दराने या शेंगा विकल्या जात आहेत. भाजून, उकडून अथवा तूरीचे हिरवे टपोरे दाणे विविध भाज्यांमध्ये टाकून दैनंदिन आहाराची लज्जत वाढविण्यात येते. शिवाय त्याचे पोषणमूल्यही वाढविले जाते. तूर हा प्रथिनांचा मोठा स्त्रोत आहे. तूरीच्या हिरव्या दाण्यांचीही भाजी बनवतात.

 

यासोबतच बाजारात आवळा, पेरु, बोरं हा आंबट गोड चविचा आणि विविध जीवनसत्वांचा खजिना असलेला रानमेवा बाजारात आला आहे. ग्राहक हा खरेदी करुन त्यावर ताव मारतांना दिसत आहेत. रानमेव्यामुळे भाजीबाजारालाही रंगत आणि आहाराला चव ही आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: food-recipes, ranmeva