महालातील फुटपाथची केली विक्री?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

महाल - फेरीवाल्यांना रोज हुसकावून लावणारा महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि कारवाईचा धाक दाखवून साहित्य जप्त करणारे वाहतूक पोलिस चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक या दरम्यान फुटपाथवर सर्रासपणे जुन्या गाड्यांच्या विक्रीचा धंदा थाटलेल्यांकडे फिरकतही नाहीत. एवढेच नव्हे तर दुकानदारांच्या दहशतीमुळे कारवाईची हिंमतसुद्धा दाखवत नाहीत. 

महाल - फेरीवाल्यांना रोज हुसकावून लावणारा महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि कारवाईचा धाक दाखवून साहित्य जप्त करणारे वाहतूक पोलिस चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक या दरम्यान फुटपाथवर सर्रासपणे जुन्या गाड्यांच्या विक्रीचा धंदा थाटलेल्यांकडे फिरकतही नाहीत. एवढेच नव्हे तर दुकानदारांच्या दहशतीमुळे कारवाईची हिंमतसुद्धा दाखवत नाहीत. 

जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्यांनी संपूर्ण रोडवरचा फुटपाथच आपल्या ताब्यात घेतला आहे. फुटपाथ आपलाच आहे अशा आविर्भावात शेकडो गाड्या फुटपाथवर रांगेत ठेवल्या जातात. कोणी टोकल्यास त्याला दम दिला जातो. ‘तेरे बाप का हैं क्‍या?’ अशी उर्मट उत्तरे दिली जातात. गेल्या अनेक वर्षांपासून गाड्यांचा धंदा तेजीत असून महापालिका आणि पोलिसांनी फुटपाथच त्यांना विकला असल्याने कोणीच काही बोलत नाही, व्यवसायातील नफ्यातील काही वाटा देऊन फुटपाथ विक्रीचे हप्ते नियमितपणे फेडल्या जात असल्याने कारवाई कोण करणार, असे वैतागलेले परिसरातील नागरिक म्हणतात.

पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी शहरातील गुन्हेगारीवरील नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आयुक्‍त स्वतः रस्त्यावर उतरून व्हेरायटी चौकात वाहतूक नियंत्रित करताना दिसले आहेत. मात्र, वाहतूक पोलिस निरीक्षकांनी आयुक्‍तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जबरदस्त ‘वसुली अभियान’ सुरू केले आहे. यामुळे आयुक्तांचाही धाक संपल्याचे दिसून येते. 

धंदा आणि राजकारण 
भाजपचे महापालिकेतील अनेक वजनदार पदाधिकारी याच परिसरात राहतात. यात माजी महापौर, माजी सत्तापक्षनेते यांचा समावेश असून याच परिसरातून ते निवडूनही आले आहेत. तेसुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना याचा जाब विचारत नाहीत. दुकानदारांना धंदा करायचा आहे आणि पदाधिकाऱ्यांना राजकारण करायचे असल्याने नागरिकांना मुकाट्याने सर्वकाही सहन करावे लागत आहे.

आमच्याकडे दुकाने नाहीत. त्यामुळे आम्ही फुटपाथवर दुकाने थाटतो. त्यासाठी वाहतूक पोलिसांशी योग्य ते संबंधही जोपासतो. वाहतुकीस थोडा फार अडथळा होतो. मात्र, त्यावर आमचे पोट भरते.
- फुटपाथवरील एक दुचाकी विक्रेता

Web Title: footpath encroachment two wheeler