फेसबुकवरील विदेशी मित्रांनी लुबाडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नागपूर - फेसबुकद्वारे मैत्री करून वकिलास सुमारे दीड लाखाने तसेच लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीची 49 हजारांनी लुबाडणूक करण्यात आली. दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपींनी ते लंडन येथील रहिवासी असल्याचे भासविले आहे, हे विशेष. 

नागपूर - फेसबुकद्वारे मैत्री करून वकिलास सुमारे दीड लाखाने तसेच लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीची 49 हजारांनी लुबाडणूक करण्यात आली. दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपींनी ते लंडन येथील रहिवासी असल्याचे भासविले आहे, हे विशेष. 

चारगाव (ता. रामटेक) येथील रहिवासी प्रफुल्ल अंबादे हे वकिलीची प्रॅक्‍टिस करतात. त्यांची अलीशहा डेनी नाव सांगणाऱ्यासोबत फेसबुकवरून मैत्री झाली. तिने प्रोफाईलवर आपला पत्ता लंडनचा दर्शविला आहे. अलीशहाने त्यांना विश्‍वासात घेतले. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात अलिशहाने लंडनहून भारतात आल्याचे सांगितले. पाऊंड बदलून घेण्यात अडचणी येत असल्याचे सांगून तिने अंबादे यांच्याकडे आर्थिक मदतीची याचना केली. सोबतच बबिता लेसराम नावाची कस्टम अधिकारी आपली मैत्रीण असल्याचे सांगून तिच्या आणि करण सक्‍सेना या दोन अकाउंटमध्ये पैसे भरण्यास सांगितले. तिच्या सांगण्यावरून अंबादे यांनी रेल्वे स्थानकाजवळील एसबीआयच्या शाखेत जाऊन दोन्ही खात्यात एकूण 1 लाख 45 हजार रुपये जमा केले. यानंतर अलिशहाने इंडियन कस्टम सर्व्हिस न्यू दिल्ली आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडे पैसे भरल्याची खोटी पावती अंबादे यांच्या व्हॉट्‌सऍप नंबरवर पाठविली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंबादे यांनी सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. 

याचप्रमाणे फेसबूक प्रोफाईलवर हाबवर्ड, लंडन येथील रहिवासी असल्याचे सांगणाऱ्या केलवीन ऍडवर्ड ओवेन याने छिंदवाडा मार्गावरील बाबासाहेब आंबेडकर कॉलनी येथील रहिवासी युवतीशी फेसबुकवरून मैत्री केली. मोबाईलवरूनही त्यांचा संवाद सुरू झाला. विश्‍वासात घेऊन तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शविली. 8 नोव्हेंबर रोजी त्याने फोन करून लग्नाची बोलणी करण्यासाठी वडिलांना घेऊन भारतात आल्याची माहिती दिली. काही वेळातच पुन्हा त्याने फोन केला. वडिलांचे वैद्यकीय तपासणीसाठी आवश्‍यक कागदपत्रे सोबत आणले नसल्याने दिल्ली विमानतळावरच अडवून ठेवण्यात आल्याची थाप मारली. पैशांची गरज असल्याने तातडीने रिना भाटिया नावाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यात 49 हजार रुपये भरण्यास सांगितले. युवतीने पैसे भरले; मात्र त्यानंतर पुन्हा त्याचा फोन आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

Web Title: foreign friends on Facebook