विदेशी युवकाशी मैत्री करणे वकील महिलेस महागात पडले, केली दहा लाखांनी फसवणूक

संतोष ताकपिरे
Saturday, 17 October 2020

एका वकील महिलेस तिच्या कथित विदेशी मित्राने तब्बल दहा लाख पाच हजार रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले. फेसबकवरून विदेशी मित्राशी केलेली मैत्री वकील महिलेस महागात पडली. त्यामुळे अनोखळी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अमरावती : सोशल मीडियावरून अनोळखी युवक, युवतीची ओळख होऊन त्यांच्यात चॅटिंग होते. विचारांचे आदानप्रदान करण्याची ही नवी पद्धत विकसित होत आहे. मात्र, कुणावर विश्‍वास ठेवावा व ठेवू नये, हे प्रत्येकाला लक्षात घेणे आवश्‍यक असते. कारण अशा मैत्रीमुळे अनेक जण आर्थिक दृष्टीने लुबाडले जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

अशी एक घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडली. एका वकील महिलेस तिच्या कथित विदेशी मित्राने तब्बल दहा लाख पाच हजार रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले. फेसबकवरून विदेशी मित्राशी केलेली मैत्री वकील महिलेस महागात पडली.

परतवाडा हद्दीत राहणारी संबंधित महिला व्यवसायाने वकील आहे. याच महिन्यात या महिलेची डॉ. डेव्हिस ऍलेक्‍स नावाच्या व्यक्तीसोबत फेसबुकवरुन ओळख झाली. एकमेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून ती त्यांनी स्वीकारली. या दरम्यान, एकमेकांशी चॅटिंग सुरू झाले. कथित डॉ. डेव्हिस याने स्वतःला इटली येथील मूळ रहिवासी असल्याचे सांगितले. चॅटिंगदरम्यान महिलेला आवडेल असेच बोलून तोतयाने आधी तिचा विश्‍वास संपादित केला.

जाणून घ्या : तब्बल आठ महिन्यांपासून सुरु होता रक्त तपासणीचा गौरखधंदा; अखेर पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई

महिलेला दिल्या भूलथापा

नुकतेच काही कामानिमित्ताने भारतात आल्यानंतर इटली येथून आणलेले ८० लाख परदेशी चलन हे कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर पकडल्याचे त्याने एके दिवशी वकील महिलेस सांगितले. ते सोडविण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने मोठा पेच निर्माण झाला, म्हणून त्याने या महिलेकडून त्यासाठी आर्थिक मदत मागितली.

महिलेने केली सायबर ठाण्यात तक्रार

कस्टम ड्युटीसह इतर चार्जेसच्या नावाखाली महिलेकडून त्याने रक्कम मागितली. ऑनलाइन व आरटीजीएस प्रणालीद्वारे महिलेने डेव्हिस ऍलेक्‍स याला टप्प्याटप्प्याने ७ सप्टेंबर ते १३ ऑक्‍टोबर या कालावधीत १० लाख ५ हजार रुपयांची रक्कम पाठविली. मात्र त्यानंतर त्याने वकील महिलेशी संवाद टाळला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्या महिलेने घटनेची तक्रार ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्यात नोंदविल्यावर डॉ. डेव्हिस विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अवश्य वाचा : बच्चू कडूंचा इंग्रजी शाळांना वऱ्हाडी झटका; खोटी माहिती दिल्यास गुन्हा नोंदविणार

अनोखळी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये
अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना, त्याची सत्यता, विश्वासार्हता पडताळून बघावी. शक्‍यतोवर ज्यामुळे आपली फसवणूक होण्याची भीती असते, अशी पद्धत टाळावी.
- वीरेंद्र चौबे, पोलिस उपनिरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती ग्रामीण.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: >Foreign man cheated with lawyer woman