परदेशी विद्यार्थ्यांनी केला खारपाण पट्टयातील शेतीचा अभ्यास 

श्रीधर ढगे
सोमवार, 26 मार्च 2018

खारपाण पट्टा असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होता. आम्ही खामगाव मतदासंघातील खारपाण पट्ट्यातील ४० गावे वान पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट केली. तसेच शेततळे व त्यावर वीज जोडणीचा राज्यातील पहिला यशस्वी प्रयोग केल्याने खारपाण पट्ट्यात नंदनवन फुलले असून, शेती व शेतकरी समृद्ध होत आहे.

- आकाश फुंडकर, आमदार  

खामगाव : प्रयोगशील शेतकरी शशिकांत पुंडकर यांच्या येऊलखेड येथील शेतीला स्पेन येथील विद्यार्थ्यांच्या चमूने भेट दिली. पुंडकर यांची जिद्द, चिकाटीतून करत असलेली शेती परदेशी पाहुण्यांना भावली. खामगाव मतदार संघातील येऊलखेड हे गाव शेततळ्यांचे गाव म्हणून राज्यात ओखळले जाऊ लागले आहे.

जलयुक्‍त शिवार योजनेच्या माध्यमातून या गावात आमदार आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून शेततळे व त्यावर वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे खारपाण पट्ट्यातील या गावात शेतकरी हे बारमाही पिके घेत आहेत. या गावातील शशिकांत पुंडकर व सुवर्णा पुंडकर या शेतकरी दाम्पत्याने प्रयोगशील शेती करत वेगळी वाट धरली आहे. त्यांच्या शेतीला आजवर अनेक राज्यातील कृषी अभ्यासक व प्रयोगशील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. दरम्यान, आज (ता. २६) स्पेनमधील ५० विद्यार्थ्यांच्या टीमने येऊलखेड येथे भेट दिली. यावेळी परदेशी पाहुण्यांनी पुंडकर यांच्या शेतावर जाऊन त्यांनी पेरूबाग, सिताफळ, कलिंगड, फुलशेती, शेडनेट हाऊसमधील काकडी, शेततळे, शेततळ्यातील मत्स्यपालन या सर्व प्रकारांची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

या गावातील शाळा, ग्रामपंचायत, व ग्रामस्थांच्या घरीही या पाहुण्यांनी भेटी दिल्या. शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून स्पेन येथील चमूचा महाराष्ट्रात शेतीविषयक दौरा सुरू असून, याअंतर्गत त्यांनी येऊलखेड येथे भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस. एस. ढाकणे, शशिकांत पुंडकर, सुवर्णा पुंडकर, डी. के. देशमुख, संतोष देशमुख, सदांनद पुंडकर, शाम वळतकर, शाम पुंडकर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

''खारपाण पट्टयातील शेतीची पध्दत जाणून घेण्यासाठी 'ब्रॅगन युनिव्हर्सिटी स्पेन' येथील ५० विद्यार्थ्यांची टीम आज येऊलखेड येथे आली होती. खारपाण पट्ट्यातील शेती हा त्यांचा अभ्यासाचा भाग असल्याने त्यांना पाहणी करून या भागात कशा विविध पद्धतीने शेती केली जाते'', याची माहिती घेतली.

 - एस. एस. ढाकणे, तालुका कृषी अधिकारी, खामगाव

Web Title: foreign students has studied Agriculture Study Khan Patta