चपराशाच्या खात्यातून झाला व्यवहार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - जिल्हा परिषदेतील कर्मचारी विनापरवानगी विदेशवारी करून आले. याप्रकरणी स्थापन केलेल्या समितीने चौकशी पूर्ण केली असून रात्री उशिरा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांना सादर केल्याची माहिती आहे. एका  चपराशाच्या खात्यातून विदेशवारी संदर्भातील संपूर्ण व्यवहार झाल्याबाबत समिती समोर चौकशीदरम्यान अनेक आश्‍चर्यकारक बाबींचा उलगडा झाला. 

नागपूर - जिल्हा परिषदेतील कर्मचारी विनापरवानगी विदेशवारी करून आले. याप्रकरणी स्थापन केलेल्या समितीने चौकशी पूर्ण केली असून रात्री उशिरा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांना सादर केल्याची माहिती आहे. एका  चपराशाच्या खात्यातून विदेशवारी संदर्भातील संपूर्ण व्यवहार झाल्याबाबत समिती समोर चौकशीदरम्यान अनेक आश्‍चर्यकारक बाबींचा उलगडा झाला. 

जिल्हा परिषदेतील २२ कर्मचारी विदेशवारीवर जाऊन आले. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी  जाण्याची परवानगी घेतली नाही. या सर्व कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी सुटी टाकली. तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी मागील वर्षीच पासपार्ट तयार केले. बांधकाम विभागातील आठ कर्मचाऱ्यांमध्ये दोन चपराशी होते.

यातील एका कर्मचाऱ्याने परवानगी घेतल्याची माहिती आहे. प्रसार माध्यमांमध्ये याचे वृत्त येताच सीईओ यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांची दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली. कर्मचारी विदेशवारीवर जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांना असल्याचे समोर आले.

त्यामुळे त्यांना समितीतून बाहेर करून त्यांच्या जागी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई आणि  वित्त व लेखा अधिकारी अहिरे यांनी नियुक्ती करण्यात आली. समितीने संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लेखी बयाण घेतले.

या बयाणांची उलट तपासणी केली. काही कर्मचाऱ्यांनी मागील तारखेत (बॅक डेट) सुटी दर्शविल्याची माहिती समोर आल्याचे समजते. एका चपराशाच्या खात्यातून संपूर्ण विदेशवारीचा खर्च करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी रक्कम जमा करून त्यांच्या खात्यात टाकल्याचे सांगण्यात आले. हे पैसे कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती आहे. बांधकाम विभागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पैशाचा व्यवहार सीसीटीव्ही कैद झाल्याची चर्चा आहे. चौकशी समितीने आपला अहवाल पूर्ण केला असून सीईओ यांना सादर केल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समितीने परवानगी घेतलेले कर्मचारी वगळता इतरांवर दोष निश्‍चित केला. त्यामुळे आता सीईओ यावर काय निर्णय घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरेही येणार अडचणीत?
शौचालय पाणी प्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागप्रमुख दीपेंद्र लोखंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सीईओंकडून प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रकरणात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्याही अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Foreign tour zp employee peon account transaction inquiry