काय सांगता! जंगलातील आगीत झालेले नुकसान मोजतात बैलबंडीने, इंग्रजांपासून सुरू असलेली पद्धत वनविभागाकडून कायम

forest department measures fire damaged in bullock card method in jamali of amravati
forest department measures fire damaged in bullock card method in jamali of amravati

जामली (अमरावती) : मेळघाटच्या जंगलात नेहमी आग लागण्याच्या घटना घडतात. यामध्ये वन, वन्यजीव, वनसंपदेचे नुकसान होत असते. इंग्रजांच्या काळामध्ये हे नुकसान बैलबंडी पद्धतीने मोजले जायचे. मात्र, इंग्रजांपासून सुरू असलेली ही नुकसान मोजण्याची पद्धती आजही वनविभागाने कायम ठेवली आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेळघाटच्या जंगलात उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटना दरदिवशी घडत आहेत. यात हजारो हेक्‍टर जंगलातील मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. वन व वन्यजीव आणि पर्यावरणीय दृष्टीने यात हानी झाली आहे. लागलेली आग विझवायला एक आठवडा लागतो. असे असतानाही या आगीत केवळ एक बंडी, दोन ते चार बंडी पालापाचोळा जळाल्याची नोंद वनविभागातील रेकॉर्डवर घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

आगीत जळालेल्या तसेच होत असलेल्या नुकसानीची वन व वन्यजीव आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून आकडेवारी मांडताना कुठलाही अधिकृत मापदंड वनविभागाकडे नाही. प्रत्यक्ष लागलेले आगक्षेत्र व जळालेले जंगलक्षेत्र दुर्लक्षित करून केवळ अंदाजित  आणि तेही निम्म्याहून कमी रेकॉर्डला दाखविले जाते. प्रत्यक्षात जळालेले जंगलक्षेत्र व रेकॉर्डला घेतल्या गेलेले जंगलक्षेत्र यात मोठी तफावत आढळून येत आहे. 

दरम्यान, जेवढे हेक्‍टर क्षेत्र दाखविल्या गेले तेवढ्याच बैलबंड्या पालापाचोळा, गवत जळाल्याचे दाखविण्यात येते. आगीत जळालेला पालापाचोळा व गवताची किंमत वनविभागाच्या नजरेत नगण्य आहे.

वन गुन्ह्यातील आरोपी बेपत्ता -
जंगलात लागलेल्या आगी या मानवनिर्मित आहेत. त्या नैसर्गिक नाहीत, असे वन व वन्यजीव विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आग लागली की वनगुन्हा नोंदविल्या जातो. हा वनगुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल केला जातो. पण या आगीच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही. एक-दोन अपवाद वगळता आगीच्या शेकडो वनगुन्ह्यातील आरोपी आजही बेपत्ता आहेत.

वनविभागाची स्थापना झाली तेव्हापासून आगीमुळे झालेल्या नुकसानीचे मापदंड हे बैलबंडीतच मोजले जातात. जळतना असो की पालापाचोळा हेक्‍टरी एक बंडी सरासरी काढली जाते. 
-अभय चंदेल, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग.

आठवड्याभरात चारशे हेक्‍टर जंगल खाक -
25 मार्च ते तीन एप्रिलपर्यंत जवळपास चारशे ते साडेचारशे हेक्‍टर जंगलाला आग लागून वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अंजनगाव वनपरिक्षेत्रातील टेंब्रूसोंडा वर्तुळातील मारोना वनखंड 1052, 1053, गवलीदेवबाबा बीट, मळी बीट, खटकाली जंगल, खिरकुंड जंगल, राजदेवबाबा बीट, मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील काही भाग आगीने भस्मसात केले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com