'नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांना "ठेकेदार राज' जबाबदार'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले "ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला. 

नागपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले "ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला. 

छत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी; तसेच जखमी जवानांची विचारपूस करण्यासाठी दिग्विजयसिंह नुकतेच रायपूरला गेले होते. तेथून परत आल्यानंतर आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की नक्षलवादी व पोलिसांमध्ये ठेकेदार मध्यस्त असून, आपल्या काळात ठेकेदार पद्धत संपुष्टात आणली होती. छत्तीसगडमध्ये आता "ठेकेदार राज' पुन्हा सुरू झाले आहे. तेंदू व दारूचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांना जो पर्यंत हद्दपार करीत नाही, तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघणे अशक्‍य आहे. केंद्रीय पथकात व राज्य पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला. 

"आप'मुुळे कॉंग्रेसचा पराभव 
आम आदमी पक्षामुळे दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्याचा युक्तिवाद दिग्विजयसिंह यांनी केला. भाजपला मदत करणे व कॉंग्रेसला पराभूत करणे, हेच "आप'चे लक्ष्य असल्याची टीका त्यांनी केली. गोवा विधानसभा निवडणुकीत "आप'ला कॉंग्रेसने पराभूत केले होते. कॉंग्रेसने त्या राज्यात अव्वल क्रमांकाच्या जागा पटकावल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्रांचा वापर बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमाने निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आजच्या आधुनिक काळात कुठलेही यंत्र "हॅक' करणे कठीण असल्याचा दावा त्यांनी केला. जगातील अनेक विकसित देश "ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमाने निवडणुका घेत असल्याचे सांगून भारतातही याच पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

Web Title: former Madhya Pradesh Chief Minister Digvijay Singh