माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • अकोट न्यायालयाचा निकाल
  • शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे दाखल झाला होता गुन्हा
  • अधिकाऱ्यांना केली होती मारहाण
  • माजी आमदार निर्दोष

अकोट (जि.अकोला) : रस्त्याचे बांधकाम सुरू असताना कामात अडथळा करणे व शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना इजा पोहोचविण्याच्या प्रकरणात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना अकोट न्यालयाने शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीन महिने तर शासकीय कर्मचाऱ्याला इजा पोहोचविल्यामुळे एक महिन्याची शिक्षा व अनुक्रम दोन हजार व 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

या प्रकरणात 2013 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनिष गणोरकर यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी गुलाबराव रामराव गावंडे (रा. कौलखेड अकोला) हे अकोट येथील बळेगाव फाटा येथे शासकीय रस्त्याचे बांधकामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपात दोषी आढळले. दोन्हीही शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत, असे न्यायालयाने नमुद केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील जित वि. देशमुख यांनी एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. साक्षिपुराव्यानुसार दोषी आढळल्याने गुलाबराव गावंडे यांना दोन वेगवगेळ्या कलमाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
अधिकाऱ्यांना केली होती मारहाण
अकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता मनोज पृथ्वीराजसिंह बैस यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनला 31 एप्रिल 2013 रोजी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार दाळू गुरूजी आणि अन्य 10 ते 12  जणांविरुद्ध लेखी फिर्याद दिली होती. या तक्रारीनुसार अकोट ते अकोला रोडवर बळेगाव फाट्यावर रोडचे काम चालू असताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सूर्यवंशी यांनी मोबाईलवरून दिलेल्या माहितीनुसार गावंडे यांनी काम थांबविले त्यामुळे उपअभियंता सरकारी वाहनाने संध्याकाळी 6.45 वा. दरम्यान घटनास्थळावर पोहोचले. तेथे गावंडे यांनी अभियंत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. गावंडे यांच्यासोबत असलेल्या एकाने उपअभियंत्याला पेटवून देण्याचे उद्देशाने कॅनमधील ज्वलनशील रासायनिक द्रव्य त्याच्या डोक्यावर ओतले. त्यावेळी श्री पाकळ हे वाचविण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली व साईटवर हजर इतर शासकीय कर्मचाऱ्यांनासुध्दा लोटपाट केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने सरकारपक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख व आरोपीतर्फे ॲड. गांधी यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपींना दोषी ठरवित शिक्षा ठोठावली.

माजी आमदार निर्दोष
रस्त्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रारीत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासोबतच माजी आमदार गजानन दाळू गुरूजी यांचेही नाव होते. मात्र त्यांना या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former minister Gulabrao Gawande sentenced to three months