माजी आमदार सिरस्कार यांची वंचितला सोडचिठ्ठी?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

  • ‘त्या’ बैठकीतील आरोप सिरस्कारांच्या जिव्हारी
  • विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा परिणाम
  • वंचित बहूजन आघाडीशी घेणार फारकत

बाळापूर (जि.अकोला) : विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने वंचितच्या पराभूत उमेदवारांनी बैठकीत माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. त्यामुळे माजी आमदार सिरस्कार प्रचंड नाराज असून, त्यांनी वंचितशी फारकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बाळापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या वंचितच्या तालुकास्तरीय बैठकीत विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवावर चांगलेच वादळ उठले. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या असहकार्यामुळे वंचितचा पराभव झाल्याचा थेट आरोप याबैठकीत झाला आहे. त्याच बरोबर माळी, मुस्लीम समाजालाही यासाठी गृहीत धरल्याने बैठकीत प्रचंड वादळ उठले. आरोप - प्रत्यारोपाचे हे वादळ बैठकीच्या तीन दिवसानंतरही शमले नाही. या आरोपांमुळे वंचितचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी वंचितला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ते पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी "सकाळशी" बोलताना सांगितले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

‘त्या’ बैठकीचा वाद आंबेडकरांकडे
वंचितच्या तालुकास्तरीय बैठकीत वादळ उठल्यानंतर माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अचानक प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी ही बाब प्रकाश आंबेडकरांना फोनवरून कळवली आहे. त्यामुळे वंचित मधील अंतर्गत शह-काटशहचे राजकारण चांगलेच तप्त झाले आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी वंचितने बोलाविलेल्या तालुकास्तरीय बैठकीत पक्षाला घरचा आहेर दिल्याची बाब थेट ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेली आहे.

सिरस्कार वंचितसोबतच असल्याचा पक्षाचा दावा
माजी आमदार बळीराम सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीसोबतच आहेत. ते कुठेही जाणार नाही. पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. काही नाराजी असेल तर बाळासाहेबांसोबतच्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर होईल, असा दावा वंचितचे पदाधिकारी व भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former mla baliram sircar leaves vanchit