माजी आमदार नरेंद्र भोंडेकर "शिवधनुष्य' सोडणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय नेत्यांच्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. पक्षांतराचे लोण भंडारा जिल्ह्यातही पोहोचले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नरेंद्र भोंडेकर "शिवधनुष्य' सोडून हाताला "घड्याळ' बांधण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी (ता. 9) मुस्लिम लायबरी सभागृहात जाहीर मेळावा आयोजित केला आहे. यात शिवसैनिकांचे मते जाणून पुढील राजकारणाची दिशा ठरविणार आहे. यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी असताना युतीसंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. युती झाल्यास भंडारा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार नाही. तर, शिवसेनेकडून स्पष्टपणे सांगितले जात नसल्याने मागील काही दिवसांपासून माजी आमदार भोंडेकर यांची शिवसेनेत घुसमट सुरू आहे. युतीची उमेदवारी मिळेल, या आशेत असलेले श्री. भोंडेकर यांचा नामोहरण होत असल्याने त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. यामुळे ते "शिवधनुष्य' सोडून हाताला "घड्याळ' बांधण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची नाराजी शिवसैनिकांसमोर व्यक्त करण्यासाठी जाहीर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते पक्षाकडून तसेच मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून पुढील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी शिवसैनिकांच्या भावना जाणून घेणार आहेत.
युती होऊनही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही. तसेच स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविल्यास शिवसेनेकडून निवडणूक जिंकणे अवघड असल्याने त्यांनी शिवसेनेला "रामराम' करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याप्रती आस्था व्यक्त करून पक्षबदलाचे सूतोवाच केले होते.

निवडणुकीसंदर्भात शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यानंतरच राजकारणाची दिशा ठरविणार. पक्षबदलासंदर्भात येणारा काळच सांगेल.
- नरेंद्र भोंडेकर,
माजी आमदार, भंडारा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Narendra Bhondekar to release 'Shiv Sena'?