गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 18) केले.

नागपूर - गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 18) केले.

नागपूर महापालिकेतर्फे महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचा अनावरण सोहळा झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, खासदार अजय संचेती आदी उपस्थित होते. किल्ले संवर्धनाकरिता रायगडाचे वैभव परत मिळविण्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचप्रमाणे राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आठवणींना उजाळा देत, 1978 मध्ये लोकवर्गणीतून जुना पुतळा उभारण्यात आला होता. त्या वेळी ब्रॉंझचा पुतळा उभारणे शक्‍य नव्हते. मात्र, ते स्वप्न दटकेंनी पूर्ण केल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

मुंबई विमानतळाचा तसेच सीएसटी स्टेशनचा एकेरी उल्लेख टाळून "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' व "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल' असा करण्यात यावा, यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सरकारचे कौतुक केले.

हायड्रोलिक सीझर लिफ्टचा प्रयोग
पुतळ्याचे अनावरण आणि माल्यार्पण करण्यासाठी हायड्रोलिक सीझर लिफ्टचा राज्यातील पहिला प्रयोग या वेळी करण्यात आला. या लिफ्टचे तांत्रिक नाव "हायड्रोलिक सीझर लिफ्ट विथ एक्‍स्टेंडेड प्लॅटफॉर्म' असे आहे. 500 किलोंची वजनक्षमता असलेल्या या लिफ्टची उंची 20 फूट आणि एक्‍स्टेंडेड प्लॅटफॉर्म 3 फुटांचा आहे. नागपुरातील युवा अभियंता श्रीष मारोतकर यांची ही संकल्पना असून, त्यांना सौमित्य मेहेर आणि वैभव घरत यांनी सहकार्य केले.

पुतळ्याची वैशिष्ट्ये
पुतळा 9 फूट उंच आणि संपूर्ण ब्रॉंझ धातूचा आहे. पुतळ्याची बैठक सॅंडस्टोनने आच्छादित आहे. चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. आकर्षक विद्युतीकरण आणि रंगीत कारंजे साकारण्यात आले आहेत. पुतळ्याभोवती 3 फूट संरक्षक भिंत उभारण्यात आली. या वेळी मूर्तिकार शंतनू इंगळे, वास्तुविशारदतज्ज्ञ प्रियदर्शन नागपूरकर, पुतळ्याची बैठक साकारणारे चंद्रमणी यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Fort forts commitment to conservation