फेसबुक फ्रेण्डने घातली विवाहितेला लग्नाची गळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

दोघांची व्हॉट्‌सऍपवरून चॅटिंग सुरू झाली. दोघांनीही भेटीगाठी सुरू ठेवल्या. ती विवाहित असल्यामुळे तसेच तिच्या पतीला संशय आल्यामुळे तिने प्रणयशी बोलण्यास टाळाटाळ सुरू केली.

नागपूर ः एका विवाहित असलेल्या 23 वर्षीय तरुणीची फेसबुकवरून युवकाशी मैत्री झाली. त्याने विवाहित असलेल्या महिलेशी चॅटिंग करीत तिचा पाठलाग केला. तिला लग्न करण्याची गळ घातली. विवाहितेने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून फेसबुक फ्रेण्डविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. प्रणय राजू गजभिये (30) असे आरोपीचे नाव आहे. तो मनपा विभागातील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 23 वर्षीय तरुणीने दोन वर्षांपूर्वी नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर नवलाईने फेसबुकवर अकाउंट उघडले. तिने लगेच कोणतीही खातरजमा न करता फ्रेण्ड रिक्‍वेस्ट पाठवणे सुरू केले. त्यामध्ये तिने प्रणय गजभिये यालाही रिक्‍वेस्ट पाठवली. त्याने रिक्‍वेस्ट स्वीकारताच फेसबुकवरून चॅटिंग सुरू केली. रोज मेसेजने बोलणे सुरू असताना दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक दिले. दोघांची व्हॉट्‌सऍपवरून चॅटिंग सुरू झाली. दोघांनीही भेटीगाठी सुरू ठेवल्या. ती विवाहित असल्यामुळे तसेच तिच्या पतीला संशय आल्यामुळे तिने प्रणयशी बोलण्यास टाळाटाळ सुरू केली.

मात्र, प्रणवने तिला जाब विचारून तिचा पाठलाग सुरू केला. ती अनेक दिवसांपासून पतीच्या संशयामुळे बोलू शकत नाही, अशी समजूत घालत होती. परंतु, प्रणयने तिला प्रेम करीत असल्याचे सांगून आता माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला. रविवारी सकाळी 11 वाजता प्रणयने तरुणीचा पाठलाग करून तिला लग्न करायचे आहे, असे म्हटले. त्यावर तरुणीने नकार दिला असता त्याने तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Found by Facebook Friend The bride's groom to the bride