Shiv Sena District Chief Arrested : सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह चौघांना अटक; संचारबंदी १४ तासांसाठी शिथिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime Logo

सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह चौघांना अटक; संचारबंदी शिथिल

अमरावती : शहरात १३ नोव्हेंबरच्या बंद दरम्यान उद्भवलेल्या दगडफेक व जाळपोळीनंतर संचारबंदी लागू झाली होती. त्यात टप्प्या-टप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह चौघांना सोमवारी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे दाखल करणे आणि त्यात सहभागी असलेल्यांचे अटकसत्र सोमवारी (ता. २२) सुद्धा सुरूच होते.

सोमवारी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह चौघांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली. जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, शहरप्रमुख पराग गुडधे, सुनील राऊत व प्रतीक डुकरे अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. १२ नोव्हेंबरच्या निदर्शनानंतर १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन भाजपने केले होते. त्यात शिवसेनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते उत्स्फूर्त सहभागी झाले. त्यांनीही घोषणाबाजी व निदर्शने केली होती.

हेही वाचा: सासू, सासरे व पत्नीचा त्रास अन् युवकाने उचलले टोकाचे पाऊल

राजेश वानखडे, पराग गुडधे यांच्या नेतृत्वात काही पदाधिकारी राजकमल चौकातून काही अंतरापर्यंत फिरले. त्याप्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्धही कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अटकेतील चौघांनाही पोलिसांनी दुपारनंतर न्यायालयासमोर हजर केले. मंगळवापासून (ता. २३) चौदा तास संचारबंदीत शिथिलता देण्यात येणार आहे. सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत आयुक्तालयाच्या हद्दीत संचारबंदीत शिथिलता राहील. तर रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेमध्ये पुन्हा संचारबंदी लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी सांगितले.

अटक आंदोलकांची संख्या ३१०वर

१३ नोव्हेंबरच्या बंदमध्ये भाजप, शिवसेना, मनसेसह इतर हिंदुत्ववादी पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. रविवारपर्यंत (ता. २१) ५५ गुन्हे दाखल होऊन त्यात ३०५ जणांना अटक झाली होती. सोमवारी पुन्हा सेनेच्या चार पदाधिकाऱ्यांसह अन्य काहींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

उद्भवलेल्या परिस्थितीनंतर कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर असून, जनजीवन सामान्य होत आहे. शहरात शांती कायम ठेवण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे.
- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती
loading image
go to top