महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर चार कोटींची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मलकापूर - महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर शुक्रवारी (ता. 11) बऱ्हाणपूर-इच्छापूर महामार्गावरील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर येथे तपासणी नाक्‍यावर वाहनांची तपासणी करताना बऱ्हाणपूर पोलिसांनी एका कारमधील तीन सुटकेसमधून 500 आणि 1000च्या नोटा असलेली चार कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी मलकापुरातील लोखंडाच्या व्यापाऱ्यासह तिघांना अटक केली.

मलकापूर येथील व्यापारी शब्बीर हुसेन याचा केजी स्टील नावाने टिन, सिमेंटचा मलकापूर व बऱ्हाणपूर येथे घाऊक व्यापार आहे. शब्बीर हुसेन, त्याचा मुलगा अजीबर आणि पुतण्या त्याच्या वाहनातून (एमएच 282153एएन) बऱ्हाणपूरकडे जात असताना अंतुली फाट्याजवळ सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी वाहन थांबवून त्याची चौकशी केली. पोलिसांना वाहनातून मोठी रोकड नेली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी वाहनाची तपासणी केली. या वेळी त्यांना वाहनाच्या दरवाजात आणि तीन सुटकेसमध्ये चार कोटी रुपयांची रक्कम दडवल्याचे निदर्शनास आले. रोकड सापडताच शहापूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन बऱ्हाणपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. बऱ्हाणपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली.

बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर येथे 19 नोव्हेंबर रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी हा पैसा पाठवला जात होता का, याची चौकशी बऱ्हाणपूर पोलिसांनी केली. मात्र, त्याचा या निवडणुकीशी संबंध नसल्याची स्पष्ट झाले. शब्बीर हुसेन ही रोकड इंदूर येथे नेत असावा, अशी शंका पोलिसांना आहे. त्यामागील त्याचा उद्देश जाणून घेण्यासाठी त्याची कसून चौकशी केली जात आहे. बऱ्हाणपूर पोलिसांनी जप्तीची माहिती आयकर विभागाला दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती बऱ्हाणपूरचे पोलिस अधीक्षक अनिल कुशवाह यांनी दिली.

Web Title: Four crore cash seized from the Maharashtra-Madhya Pradesh border