आवडत्या क्रमांकासाठी मोजले तब्बल चार कोटी!

अतुल मेहेरे
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : आपल्या आवडीची गाडी घेतल्यानंतर गाडीचा विशिष्ट नंबर असला पाहिजे, अशी अनेक गाडीप्रेमींची भावना असते. विशिष्ट नंबर असणे हा अनेकांच्या श्रद्धेचा, तर अनेकांच्या अंधविश्‍वासाचाही भाग असतो. त्यामागे कुणाचे अंकगणित असते, तर कुणाचे भाग्य आणि भविष्याचेही ठोकताळे असतात. मग विशिष्ट नंबर मिळविण्यासाठी हवे तेवढे जादा पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी असते. त्यासाठी वाटेल ती धडपड, धावपळ केली जाते. अशाच विशिष्ट नंबरप्रेमी नागपूरकरांनी गेल्या वर्षात सुमारे चार कोटी रुपये खर्च केले.

नावात काय आहे, असे शेक्‍सपिअरने म्हटले आहे. त्याचप्रमाणे नंबरमध्ये काय ते विशेष, असा प्रश्‍न विचारणारेही आज आहेत. पण, आपल्या गाडीसाठी विशिष्ट नंबर मिळविण्यासाठी धडपडणारे 5 हजार 292 लोक नागपूर जिल्ह्यात आहेत. या वाहनधारकांनी 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या एका वर्षात 3 कोटी 87 लाख 53 हजार रुपये खर्च केले आहेत. परिवहन विभागाच्या नागपूर शहर कार्यालयाअंतर्गत 1,484 वाहनधारकांनी 1 कोटी 27 लाख 64 हजार रुपये, नागपूर पूर्वमधून 1,611 वाहनधारकांनी 1 कोटी 45 लाख 53 हजार, तर नागपूर ग्रामीण कार्यालयाअंतर्गत 2,197 वाहनधारकांनी 1 कोटी 14 लाख 89 हजार रुपये खर्च केले आहेत.
म्हणून आकारले जाते शुल्क
पूर्वी उच्चपदस्थ मंडळी किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्यांनाच विशिष्ट नंबर असायचे. त्यासाठी परिवहन विभागाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते; तर ही मंडळी आपली "वट' वापरून नंबर मिळवायची. पण, नंतर बऱ्याच जणांसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनून वाद आणि भानगडी होऊ लागल्या. त्यामुळे परिवहन विभागाने विशिष्ट आकर्षक नंबरसाठी अतिरिक्त शुल्क आकारणे सुरू केले. याची किंमत तीन हजार रुपयांपासून तर 3 लाख रुपयांपर्यंत आहे. यातून विभागाचे उत्पन्नसुद्धा वाढले.
फॅन्सी नंबरवर कारवाई नाही
अतिरिक्त शुल्क भरून मिळविलेला क्रमांक वाहनधारक वाट्टेल तसा नंबरप्लेटवर टाकतात. यामध्ये बव्हंशी नावांचा समावेश असतो. दादा, मामा, नाना, राम, राऊत अशी नावे "फॅन्सी' पद्धतीने वापर करून नंबरप्लेटवर टाकली जातात. परिवहन विभागाकडून अशा नंबरप्लेट्‌सला सुरक्षेच्या दृष्टीने मान्यता नाही. तरीही वाहनधारक अशा नंबरप्लेट्‌स सर्रास मिरवताना दिसतात. पण, परिवहन विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four crore for the favorite number!