‘एसीबी’कडून आणखी चार गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी चार गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये आजी-माजी अधिकाऱ्यांसह १७ जणांचा समावेश आहे. एसीबीने विशेष पथकाची नेमणूक करून तपास सुरू केला होता. आतापर्यंत या प्रकरणात २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नागपूर - गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी चार गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये आजी-माजी अधिकाऱ्यांसह १७ जणांचा समावेश आहे. एसीबीने विशेष पथकाची नेमणूक करून तपास सुरू केला होता. आतापर्यंत या प्रकरणात २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंबंधी उघड चौकशी करण्याचे आदेश एसीबीला मिळाले होते. त्यामुळे गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी नागपूर एसीबी करीत आहे. जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारामध्ये समावेश असल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक राजेंद्र नागरे, उपाधीक्षक मिलिंद तोतरे, विजय माहूलकर आणि पीआय शुभांगी देशमुख यांनी केली.

पहिला गुन्हा
गोसेखुर्द उजवा मुख्य कालवा ७८ ते ९० किमी. यामध्ये मातीकाम व बांधकाम आणि ३१ ते ९० मधील अस्तरी करण्याचे काम (सा.क्र. ७५४०० मी ते ७६१८० मी. वगळून) या कामाच्या निविदा प्रकियेत नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढवले. अवैध-निम्न स्तरावर निविदेच्‍या अद्ययावतीकरणास कार्यकारी संचालक यांनी मंजुरी स्वीकृती दिली. या कामकाजात विभागीय लेखाधिकारी गुरूदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के हे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वरील पाचही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

दुसरा गुन्हा
गोसेखुर्द उजव्या कालव्या वरील बी-१ ब्रॉच किमी ८००१ ते १७०० मधील मातीकाम व बांधकामात या कामाच्या निविदा प्रकियेत नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढवले. अवैध-निम्न स्तरावर निविदेच्या अद्ययावतीकरणास कार्यकारी संचालक यांनी मंजुरी स्वीकृती दिली. या कामकाजात विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, आणि कार्यकारी संचालक रो. मा. लांडगे यांनी पैशाच्या आमिषापोटी गैरव्यवहार केला.

तिसरा गुन्हा 
गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी कालवा सा.क्र. २५७९० मी. वरून निघणारा घोडाझरी उपशाखा क्र. १ चे किमी ० ते २६ मधील मातीकाम व त्यावरील अस्तरीकरण वगळून बांधकामे या कामाचे निविदाप्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढवले. अवैध-निम्न स्तरावर निविदेच्या अद्ययावतीकरणास कार्यकारी संचालक यांनी मंजुरी स्वीकृती दिली. या कामकाजात कार्यकारी अभियंता ललित इंगळे, विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी आणि कार्यकारी संचालक दे. प. शिर्के यांनी पैशाच्या आमिषापोटी गैरव्यवहार केला.

चौथा गुन्हा
गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी कालवा सा. क्र. ८७००० मी. वरून निघणाऱ्या शाखा कालवा क्र. ५ चे किमी ० ते ४.९५ वरील मातीकाम व त्यावरील अस्तरीकरण वगळून बांधकामे या कामाचे निविदाप्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढवले. कार्यकारी संचालक यांनी मंजुरी स्वीकृती दिली. या कामकाजात विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, आणि तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के यांनी पैशाच्या आमिषापोटी गैरव्यवहार केला.

Web Title: Four more cases were filed by the ACB