चारवेळा निविदा; पण एकाच संस्थेला काम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

तुमसर (जि. भंडारा) : तुमसर शहरातील घराघरांतून तसेच बाजारातून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगर परिषदेने एका वर्षात चौथ्यांदा निविदा मागविल्या. तरीही अद्याप एकाच कंत्राटदाराला वारंवार मुदत वाढवून सफाईचे काम केले जात आहे. याबाबत योग्य कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील 15 नगरसेवकांनी पालकमंत्री परिणय फुके यांना निवेदनातून दिला आहे.

तुमसर (जि. भंडारा) : तुमसर शहरातील घराघरांतून तसेच बाजारातून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगर परिषदेने एका वर्षात चौथ्यांदा निविदा मागविल्या. तरीही अद्याप एकाच कंत्राटदाराला वारंवार मुदत वाढवून सफाईचे काम केले जात आहे. याबाबत योग्य कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील 15 नगरसेवकांनी पालकमंत्री परिणय फुके यांना निवेदनातून दिला आहे.
2017 ला 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील घराघरातील तसेच बाजारातून एकत्रित होणारा घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया करण्याकरिता निविदा काढली होती. त्यात रामटेक जिल्ह्यातील शारदा महिला बचतगट हिवरा या संस्थेला कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषदेने या संस्थेसोबत करारही केला होता. या कराराची मर्यादा 31 मार्च 2018 पर्यंत होती. तत्पूर्वी, नगर परिषद प्रशासनाने नवीन निविदा काढायला पाहिजे होती. परंतु, त्याच संस्थेला वाढीव आदेश देऊन काम देण्यात आले.
काही नगरसेवकांनी याचा विरोध केला तेव्हा 2018-19 करिता निविदा मागविण्यात आली. त्यामध्ये या कामाकरिता सर्वात कमी रकमेची निविदा राजीव सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशिय सेवा सहकारी संस्थेची होती. त्यामुळे या संस्थेला कामाचे कंत्राट मिळाले. परंतु, येथील नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांना ते मानवले नाही. यावर काही नगरसेवकांनी तोंडी आक्षेप घेतल्याचे सांगून हे कंत्राट नामंजूर केले.
त्यानंतर पुन्हा याच कामासाठी दुसऱ्यांदा जून 2019 ला निविदा मागण्यात आली. तेव्हा कामाची किंमत एक कोटी 47 लाख रुपये होती. यावेळी सर्वात कमी किमतीची निविदा (91 लाख,22 हजार,227 रुपये) शारदा महिला मंडळ हिवरा यांची होती. त्यांना नगर परिषदेच्या सभेत कंत्राट मंजूर करण्यात आले. परंतु, या कामासाठी संस्थेला जवळपास 40 ते 50 लाख रुपये अमानत रक्कम भरायचे होते. तसे पत्र नगरपरिषदेने दिले. परंतु, संस्थेने एवढी रक्कम भरण्यास नकार दिल्याने पुन्हा निविदा रद्द करण्यात आली.
या कामाकरिता तिसऱ्यांदा निविदा मागविली. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्यांदा पुन्हा प्रक्रिया रद्द करण्यात आली. तरी आतापर्यंत शारदा महिला बचतगट हिवरा हीच संस्था वाढीव आदेशावर घनकचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया करत आहे. त्यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा चौथ्या वेळेस जुलै 2019 मध्ये निविदा मागविण्यात आल्या. यावेळी सर्वात कमी किंमतीची निविदा (12 टक्‍के कमी) शारदा महिला बचतगटाची असल्याने त्यांना कंत्राट मंजूर करण्यात आले. परंतु, अद्याप सभेमध्ये याला मान्यता मिळाली नाही.
आतापर्यंत चार वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, 2017 ला ज्या संस्थेला शहरातील घनकचरा संकलन व वाहतूकीचे कंत्राट दिले होते. तीच संस्था अद्याप शहरातील घनकचरा उचलण्याचे काम करीत आहे. यावरून नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four times tender; But work for the same organization