ऋत्विजा, तुझ्या संवेदनशीलतेला सलाम 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

आपल्याच वयातील मुलीला आजारपणामुळे केस गमवावे लागले. हिच्यासाठी आपण काय करू शकतो असा विचार तिच्या मनात आला. मनातील विचार तिने आई मंगेशी यांना सांगितला. मंगेशी यांनी कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान करता येतात असे ऋत्विजाला सांगितले.

नागपूर : प्रत्येक मुलीचे स्वप्न असते सुंदर काळेभोर लांब केस. त्यामुळेच तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. परंतु, वर्ध्यातील अवघ्या चौदा वर्षांच्या मुलीने या सौदर्याला तिलाजंली देत, कॅन्सरग्रस्तांसाठी आपले सुंदर केस दान केले आहेत. केस काढल्यानंतर आपला चेहरा कसा दिसेल, लोक काय म्हणतील, हा विचार तिच्या मनात आला नाही, तर आपल्या या लांब केसांमुळे कुणीतरी कॅन्सरग्रस्त, आपल्याच वयाची मुलगी छान दिसेल, यामुळे तिला थोडातरी आनंद मिळेल ही भावना ऋत्विजाची आहे. 

 

Image may contain: 1 person, smiling, sitting and shoes
ऋत्विजा मून

तिचे वय तसे फार नाही तर जेमतेम चौदा वर्षे.. पण या लहान वयात तिने दाखवलेल्या संवेदनशीलतेला खरोखर सलाम केलाच पाहिजे. या सामाजिक जाणिवेची ओळख अधोरेखित करणाऱ्या मुलीचे नाव आहे ऋत्विजा मंगेशी मून. विदर्भातील सामाजिक कार्यात ओळख असलेल्या मंगेशी मून यांची ही कन्या. शाळेतून बसमध्ये येत असताना बाहेर एक आपल्याच वयाची मुलगी फिरताना दिसली. तिच्या डोक्‍यावर एकही केस नव्हता. चेहरा मलूल आणि दुःखी दिसत होता. 

अधिक माहितीसाठी - सीसीटीव्हीत कैद झाली ही अनोखी चोरी... एकदा बघाच  

कॅन्सरग्रस्तांसाठी त्यागले केस 
आपल्याच वयातील मुलीला आजारपणामुळे केस गमवावे लागले. हिच्यासाठी आपण काय करू शकतो असा विचार तिच्या मनात आला. मनातील विचार तिने आई मंगेशी यांना सांगितला. मंगेशी यांनी कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान करता येतात असे ऋत्विजाला सांगितले. तेव्हाच तिने निश्‍चय केला आपणही केस दान करायचे आणि एका कॅन्सरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे. यासाठी तिने माहिती काढली. त्यातून तिला मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या "मदत चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेची माहिती मिळाली.

तिने संस्थेतील डॉक्‍टरांशी संपर्क साधून, आपले केस दान करण्याची इच्छा जाहीर केली. त्यांनी किमान बारा इंच केस पोणी स्वरूपात दान करता येत असल्याचे सांगितल्यावर, ऋत्विजाने त्याच पद्धतीने केसांच्या पोणी घालत, लागलीच आपले केस कापून त्या संस्थेकडे पाठविले. ऋत्विजाने दाखवलेल्या धाडसाने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. तसेच तिचे समाजातून कौतुकदेखील होत आहे. 

दान केलेल्या केसांचे काय होते? 
मदत संस्थेप्रमाणेच मुंबईत आणखी काही स्वयंसेवी संस्था कॅन्सरग्रस्तांसाठी विग बनविण्याचे कार्य करतात. तीन वर्षे ते साठ वर्षे वयापर्यंत शेकडो व्यक्तींनी गेल्या सहा वर्षांमध्ये कर्करुग्णांसाठी आपल्या केसांना कात्री लावली आहे. नैसर्गिक रंगाचे सुमारे बारा इंच केस दान करण्यात येतात. नैसर्गिकरीत्या पिकलेले किंवा चंदेरी झाक आलेले केस स्वीकारले जातात. बारा इंच लांबीचे केस एकसलग कापलेले असतात, कारण त्यांचाच पुनर्वापर विग बनवण्यासाठी होतो. 

क्लिक करा - Video : साठ वर्षे शेतात राबला हा पोशिंदा, आता झाला सेवानिवृत्त

मानसिक आधार देऊ शकतो 
कॅन्सरग्रस्त रुग्ण फार कठीण परिस्थितीला तोंड देतात. या रुग्णांच्या शारीरिक वेदना आपण कमी करू शकत नाही मात्र त्यांना मानसिक आधार देऊ शकतो. त्यामुळे या रुग्णांसाठी काहीतरी करावे अशी भावना मनात होती. याचसाठी मी माझे केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- ऋत्विजा मंगेशी मून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourteen year old girl initiative for cancer patients