चार्टर्ड अकाऊंटंटचा 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

  • फेसबुक फ्रेंड्‌सशिप नववीच्या विद्यार्थिनीला भोवली 
  • मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले 
  • लग्न करण्याच्या आमिषाची भूल 

नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुक फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सीएला अटक केली. हर्षल पदमगिरवार (वय 24, रा. संघ बिल्डींगजवळ, महाल) असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी हर्षल पदमगिरवारने तिरपुडे कॉलेजमधून पदवी घेतली आहे तर त्यानंतर सीए केले आहे. तर पीडित 14 वर्षीय मुलगी सुहानी (बदललेले नाव) ही मूळची कुही तालुक्‍यातील एका खेडेगावातील आहे. शेतकरी असलेले आईवडील दोन्ही मुलीच्या शिक्षणासाठी नागपुरात स्थायिक झाले. लहान मुलगी पाचवीत तर सुहानी नवव्या वर्गात शिकते. त्याने फेसबुकवरून हिला फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवली. त्यानंतर सलग तिच्या पोस्ट फॉलो करीत तिचा पाठलाग केला. सुहानीने त्याची फ्रेंड रिक्‍वेस्ट स्विकारताच त्याने चॅटिंग सुरू केली. 1 एप्रिल 2018 पर्यंत दोघांची फेसबुकवरून घट्‌ट मैत्री झाली. हर्षलने तिला मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर तिच्याशी फोनवरून आणि व्हॉट्‌सऍपवरून संपर्क साधला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला फुटाळ्यावर भेटायला बोलावले. सुहानीसुद्धा एका मैत्रीणीला घेऊन फुटाळ्यावर गेली. तेव्हापासून दोघांचे प्रेमसंबंध वाढत गेले. फेब्रुवारी महिन्यात हर्षल सुहानीच्या घरी गेला. त्याने सुहानीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. 18 वर्षाची झाल्यावर लग्न करण्याचे आमिष दाखवले. 

फोनमुळे झाला घोळ :
सुहानी ही सतत फोनवर कुणीतरी मुलाशी बोलत असल्यामुळे तिच्या आईला संशय आला. आईने तिचा मोबाईल चेक केला असता त्यामध्ये हर्षलचे फोटो दिसले. तिला विचारणा केली असता तिने मित्र असल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, घरी कुणी नसताना एक मुलगा येत असल्याची बाब लहान बहिणीने आईला सांगितली. त्यामुळे हर्षलचे नाव उघडकीस आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourteen year old girl raped by chartered accountant at Nagpur