पुण्याच्या डॉक्टरला दहा लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

बुलडाणा : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या उंद्री गावात पुणे जिल्ह्यातील एका वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरला घराचे खोदकाम करताना सोन्याचा हंडा सापडला असून तो तुम्हाला देतो म्हणत एका व्यक्तीने तब्बल दहा लाख रुपये घेऊन गंडविले. यावेळी लुबाडणूक करणार्‍यांचा विरोध केला असता डॉक्टरला मारहाण करून दोन मोबाईलही हिसकावण्यात आले. याप्रकरणी तक्रार देताच अमडापूरचे ठाणेदार सुनील आंबुलकर यांनी तातडीने तपासचक्रे फिरवून चोवीस तासांत आरोपीला गजाआड केले.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील काळेगाव (आळंदी देवाची) येथील रहिवासी असलेले डॉ. कैलास परशमराव पवार (वय 48) यांच्या गावी संतोष जाधव (धदम, ता. खामगाव) हा गेल्या सहा महिन्यांपासून घराचे बांधकाम करीत होता. त्याने डॉक्टरला विश्वासात घेतले. आमच्या गावाकडे खोदकामात एक सोन्याचा हंडा मिळाला आहे. परंतु आमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड नसल्याने आम्ही ते सोने विकू शकत नाही, असे सांगून त्याने डॉक्टरला एक सोन्याचे खरे नाणे दिले. त्या नाण्याची तपासणी केली असता ते खरे निघाले. सोन्याचा हंडा आम्ही इकडे आणू शकत नाही म्हणून त्याने 1 जूनला उंद्री येथील लाखनवाडा रोडवरील एका शेतात बोलावून घेतले व पैसे आणले का? अशी विचारणा केली. यावेळी डॉक्टरकडून दहा लाख रुपये रोख घेतले. डॉक्टरने सोन्याबाबत विचारणा केली असता संतोष जाधवसह पाच जणांनी डॉक्टरला मारहाण करून 14 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेतले.

डॉ. कैलास पवार यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संतोष जाधवसह पाच व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले. ठाणेदार सुनील आंबुलकर, पीएसआय प्रकाश पवार यांनी गतीने तपास करून संतोष जाधवला अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud of 10 lakhs to doctor at Buldana