लग्न कर्तव्य आहे का? चांगली वधू आहे, असा फोन आल्यास सावधान!

सकाळ वृत्तसेवा | Monday, 15 June 2020

तुमसर शहरात सतत गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. त्यामुळे हे शहर सामान्यांना असुरक्षित वाटते. आता लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे कारनामे उघड झाले आहेत.  

तुमसर (जि. भंडारा) : तुमच्या मुलाचे लग्न करायचे आहे का, चांगली मुलगी लक्षात आहे. एक-दीड लाख देत असाल तर मुलीला घेऊन येतो आणि लग्न लाऊन देतो, असा फोन आल्यास सावधान, कारण अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून लाखोंनी ठगणारी टोळी भंडारा जिल्ह्यात सक्रीय आहे. आणि लग्नासाठी आणली जाणारी वधुही या टोळीतीलच आहे.

या टोळीने मध्यप्रदेशातील एका कुटुंबाकडून पैसे मिळाल्यावर मुलीसोबत पोबारा केला होता. परंतु, नंतर अधिक लोभामुळे हेच आरोपी अलगद सापडल्याची चर्चा तुमसर शहरात दोन दिवसांपासून सुरू आहे.

तुमसर शहरात सतत गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. त्यामुळे हे शहर सामान्यांना असुरक्षित वाटते. आता लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे कारनामे उघड झाले आहेत.

शहरातील जगनाडे नगरातील टोळी परप्रांतात लग्न न झालेल्या मुलांची माहिती गोळा करून त्यांच्याकडून मोठी रक्कम लुबाडत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. मध्यप्रदेश येथील नरसिंगपूर तालुक्‍यातील एका कुटुंबाशी लग्न लावून देणाऱ्या टोळीने काही दिवसांपूर्वी संपर्क साधला. येथे लग्नास योग्य मुलगी असून तिच्याशी लग्न लावून देण्याकरिता एक लाख 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

याबाबत मुलाकडील मंडळीनी होकार दिल्यावर ठरलेल्या तारखेला टोळीचे सूत्रधार त्या मुलीबरोबर बुलंदशहर येथे गेले. रक्कम स्वीकारल्यावर मुलीचे ठरलेल्या मुलाशी लग्न झाले आणि त्याच रात्री टोळीतील व्यक्ती मुलीला सोबत घेऊन पळून आले.
दरम्यान फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी अन्य एका व्यक्तीच्या मार्फत याच टोळीतील व्यक्तीशी संपर्क साधून त्वरित लग्नासाठी मुलगी असल्यास दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले.

तेव्हा हेच लोक पुन्हा त्याच मुलीसोबत जाण्यास तयार झाले. ठरल्यानुसार ते तुमसर येथून एका भाड्याच्या वाहनाने 11 जूनला निघाले. पोहोचल्यावर संबंधितांशी संपर्क साधला. त्यांनी वाहन चालक, लग्नासाठी गेलेली मुलगी यांच्यासोबत अन्य चौघांना पकडले. लग्नाच्या नावावर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना मारहाण करून त्यांना जेरबंद केल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधितांनी वाहन मालकाशी संपर्क साधून यापूर्वी झालेल्या फसवणूकीची रक्कम परत करून आपले वाहन घेऊन जाण्यास सांगितले.
सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ
या सर्व प्रकरणाचे बिंग फुटले असून, वाहन मालक चिंतेत सापडला आहे. सदर वाहन भाड्याने दिले असून मी ही रक्कम देऊ शकत नाही. तुम्ही चालकासोबत वाहन पाठवून द्या अशी विनंती मालकाने केली. परंतु, ते काहीही ऐकण्यास तयार नाहीत, असे कळते. अद्याप वाहन चालकासह आरोपींची सुटका झाली किंवा नाही याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, यामुळे तुमसर शहरांतच गुन्हेगारी कृत्य करणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.