Fraud of Rs one lakh fifty thousand by Livestock Development Officer
Fraud of Rs one lakh fifty thousand by Livestock Development Officer

पेटीएमची केवायसी करण्यासाठी आला फोन अन्‌ व्यवहार केल्यानंतर बसला धक्‍का

अमरावती : ऍप डाउनलोड करताच पशुधन विकास अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यामधून एक लाख 54 हजारांची रोकड तोतयाने दुसऱ्या खात्यात वळती करून फसवणूक केली. भारतभूषण श्रीरामपंत अस्वार (वय 50) असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

अस्वार यांना बुधवारी (ता. 10) एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला. संपर्क साधणाऱ्याने पेटीएममधून बोलत असल्याचे सांगून पेटीएमची केवायसी करायची असल्याची माहिती डॉ. अस्वार यांना दिली. त्यासाठी फोनवर क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. ऍप डाउनलोड केल्यावर अस्वार यांना तोतयाने पेटीएमवरून एक रुपया ट्रान्झॅक्‍शन करण्याचा सल्ला दिला.

तोतयाच्या म्हणण्यावर अस्वार यांनी विश्‍वास ठेवून सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी केली. त्यानंतर काही मिनिटांतच अस्वार यांच्या डेबिट कार्डमधून एक लाख रुपये तर क्रेडिट कार्डमधून 54 हजार रुपये असा एक लाख 54 हजार रुपयांची रक्कम तोतयाने ऑनलाइन दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून काढून फसवणूक केली. अस्वार यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी संबंधित सीमकार्ड धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

युवा शेतकऱ्याचे एक लाख लुबाडले

मोर्शी तालुक्‍याच्या उदखेड येथील आकाश प्रकाश गाडे (वय 23) या युवा शेतकऱ्याला एकाने फोन करून लोन स्नॅप डीलमधून बोलत असल्याचे सांगितले. लकी ड्रॉमध्ये टाटासुमो बक्षीस मिळाल्याची बतावणी केली. त्यानंतर विविध कारणे सांगून एका सीमकार्ड धारकाने आकाशला ऑनलाइन पद्धतीने एक लाख दोन हजार रुपये एवढी रक्कम भरण्यास भाग पाडून त्याची फसवणूक केली. ग्रामीण सायबर पोलिसांनी सीमकार्ड धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अनोळखीवर विश्‍वास ठेऊ नका 
अशा प्रकारचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवून कोणतेही ऍप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खात्री करायला हवी. 
- प्रवीण काळे, 
पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com