महिलेकडून महिलांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

रामटेक  (जि.नागपूर)  अवघ्या 200 रुपयात एक साडी, दोन जोडी बूट, ओळखपत्र, दहा जणींच्या गटाला एक लाख रुपये अशी आमिषे दाखविणाऱ्या महिलेला तालुक्‍याच्या अनेक गावांतील महिला भुलल्या. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 

रामटेक  (जि.नागपूर)  अवघ्या 200 रुपयात एक साडी, दोन जोडी बूट, ओळखपत्र, दहा जणींच्या गटाला एक लाख रुपये अशी आमिषे दाखविणाऱ्या महिलेला तालुक्‍याच्या अनेक गावांतील महिला भुलल्या. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 
मनसर येथील आमराई भागात राहणारी वंदना रमेश सांगोडे (वय 30) ही रामटेक शहरासह आमगाव, नवरगाव, मुकनापूर अशा गावांतील महिलांना भेटली. त्यांना 200 रुपयात एक साडी, दोन जोडी बूट, ओळखपत्र, कामावर जाण्यासाठी बस अशी आमिषे दाखवली. दहा जणींचा एक गट बनवून एकीची अध्यक्ष म्हणून निवड करायची. अध्यक्ष महिलेला एक लाख रूपये देण्यात येतील. त्या रकमेतून प्रत्येक महिलेला 2000 रुपये ऍडव्हान्स दिला जाईल, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये, आधारकार्डाची झेरॉक्‍स प्रत, दोन पासपोर्ट घेतले. यात तरुणी, महिला यांचा समावेश होता. रविवारी आमगाव टोला येथे ही महिला तेथील महिलांना अशाच प्रकारे आमिष देत असताना नवरगाव ग्रामपंचायतच्या माजी सदस्य तथा विद्यमान सरपंच श्रीमती गेडाम यांचे पती नितीन गेडाम तिथे आले. त्यांच्या गोष्टी ऐकून त्यांनी हे सगळे खोटे आहे. विनाकारण फसू नका, असा इशारा दिला. मात्र त्या महिलांनी ऐकले नाही. ती महिला गटाच्या अध्यक्षांसह दोन, तीन महिलांना घेऊन कामठी येथील कारखाना दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना फिरवून आणायची. कामठीच्या ड्रॅगन पॅलेसजवळ कारखाना आहे असे सांगायची. शेवटी सोमवारी शहरातील 50-60 महिलांनी या महिलेवर प्रश्नांची सरबत्ती करून उत्तरे मागितली. मात्र ती उत्तरे न देऊ शकल्याने तिला पकडून रामटेक पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 
पैसे परत करण्याचे मान्य 
पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना या महिलेने मी सर्वांचे पैसे परत करते. मी 50 हजार रुपयेच घेतले आहेत. मीदेखील याचप्रकारे बाहेरील गावाच्या एका महिलेचे आठवड्याला दोन हजार याप्रमाणे काम करते, अशी माहिती दिली. महिलेच्या पतीलाही ठाण्यात आणण्यात आले होते. बातमी लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय शेंडगे करीत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of women by woman