आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबातील लोकांवर आर्थिक संकट येते. त्यातूनच मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अशा मुलांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे नि:शुल्क शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली

नागपूर - नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबातील लोकांवर आर्थिक संकट येते. त्यातूनच मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अशा मुलांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे नि:शुल्क शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली.

संगणकीय आणि कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण देण्याकरिता मुक्त विद्यापीठाने फिरत्या वाहनाची व्यवस्था केली आहे. या वाहनाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या महाल येथील घरापासून करण्यात येणार आहे. यासाठी नागपुरात आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. वायुनंदन म्हणाले, विद्यापीठाद्वारे कृषी विषयांवर अभ्यासक्रम असून, अनुसंधानाची चांगली सोय आहे. त्याचा उपयोग राज्यातील शेतकऱ्यांना करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. विद्यापीठाची आठ विभागीय केंद्रे आहेत. विद्यापीठ प्रत्येक विभागीय केंद्रांच्या माध्यमातून एक गाव दत्तक घेणार आहे. नागपूर विभागीय केंद्रात वर्धा जिल्ह्यातील केळापूर गावाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना, त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून देणे, शेतकऱ्यांच्या मुलांना विविध कृषी अभ्यासक्रम, पीक पाणी, खते, नैसगिक शेती आणि इतर विविध गोष्टींची माहिती नि:शुल्क देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र शासनाच्या कॅशलेस योजनांचाही प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पदभरतीचा "बॅकलॉग' संपविणार
विद्यापीठ गेल्या काही वर्षात बरेच मागे आले. त्याचे कारण बऱ्याच प्रमाणात प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पदभरतीचा बॅकलॉग आहे. तो भरून काढण्यासाठी विद्यापीठाने कारवाई सुरू केली असल्याची माहिती डॉ. वायुनंदन यांनी दिली. ते म्हणाले, विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे तीन महिन्यांत भरण्यात येणार आहे. शिवाय विविध प्रमोशन थांबले असून त्याची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होईल. तसेच विविध ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ते नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: free education foe those...