esakal | राष्ट्रसंतांची प्रेरणा आणि नागपंचमीचा आष्टी-चिमूर-यावलीचा स्वातंत्र्य लढा
sakal

बोलून बातमी शोधा

rashtrasant

नागपंचमीच्या दिवशी 16 ऑगस्ट 1942 रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या गावात स्वातंत्र्य लढा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने लढला गेला. या घटनेचे हे 78 वे वर्ष आहे.

राष्ट्रसंतांची प्रेरणा आणि नागपंचमीचा आष्टी-चिमूर-यावलीचा स्वातंत्र्य लढा

sakal_logo
By
डॉ. राजेंद्र मुंढे

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात 1942 च्या ऑगस्ट क्रांतीलढ्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा निर्वाणीचा लढा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात "करा अथवा मरा' हा भारतीयांना आणि "भारत छोडो' या इंग्रजांना दिलेल्या लघु नाऱ्यांमधून लढला गेला. विदर्भातील या लढ्याला प्रखर आणि धगधगता निखारा देण्याचे काम वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी केले. हजारो लोकांना आपल्या प्रभावी भजनांतून तसेच भाषणांतून राष्ट्रीयतेची जाणीव करून देणाऱ्या राष्ट्रसंतांनी 1942 च्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातून अभूतपूर्व असा रंग भरला. "बासरी सोडून द्या, बना सुदर्शनचक्रधारी' असा संदेश ते देत होते. "अब काहेको धूम मचाते' या भजनातून इंग्रजांना इशारा देत महाराज म्हणाले,

"झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना ।
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेंगी किनारे।।

महाराजांच्या भजनांमधून आणि त्यांनी आष्टी, चिमूर, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी सुरू केलेल्या आरतीमंडळाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याची मशागत होत होती आणि स्वातंत्र्य लढ्याची भूमी तयार होत होती. आरतीमंडळाचे अतिशय सूत्रबद्ध काम गोपनीय पद्धतीने शामरावदादा मोकद्दम यांच्या मार्गदर्शनात चालले होते.

विदर्भातील आष्टी, चिमूर आणि यावली येथील क्रांतिलढ्यात बजावलेली भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली. प्रत्यक्ष आष्टीत महाराजांनी प्रथम 14 ऑगस्ट 1934 साली गांधी चौकात ब्रिटिशांच्या रोषाची तभा न बाळगता गोपाळराव वाघ, मल्लिकार्जून अप्पा गंजीवाले यांच्या विनंतीवरून सर्वप्रथम तिरंगी ध्वज फडकवला. दुसऱ्यांदा 2 जून 1940 रोजी महाराजांनी ध्वज फडकवला. असेच ध्वजारोहण महाराजांनी चातुर्मास निमित्ताने चिमुरात केले. यावली हे तर राष्ट्रसंतांचे जन्मगावच.

गांधीजींनी आठ ऑगस्टला "भारत छोडो' हा नारा दिला आणि 9 ऑगस्टला महाराजांचे आष्टीला गांधी चौकात भजन झाले. भजनातून आरती मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक मार्गदर्शन करुन "पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्‍त बनेंगी सेना' हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचा सल्ला त्यांनी दिला. 10 ऑगस्टला तळेगाव (शा.पं.), खरांगणा (मोरांगणा) वर्धा आणि 12 ऑगस्टला हिंगणघाट येथे असा झंझावती भजन आणि भाषणांचा कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील 1942 च्या क्रांतीलढ्याचे रंणशिंगच त्यांनी या माध्यमातून फुंकले गेले. 13 ऑगस्टला ते चिमुरात पोहचले.

आष्टी आणि चिमूरला क्रांती घडली तो दिवस होता नागपंचमी. 16 ऑगस्ट 1942. आष्टी येथील पोलिस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम आधी 17 ऑगस्टला ठरला होता. परंतु, 16 ऑगस्टला आंदोलन तीव्र झाले. गावकरी आणि ब्रिटिश शिपाई यांच्यात स्वातंत्र्य संग्राम घडून आला. जनतेमधील रोष बघून इन्स्पेक्‍टरने वाटाघाटीसाठी मोतीराम होले आणि पांडुरंग सव्वालाखेंना आत घेतले तर रामभाऊ लोहे जनतेला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. या दोघांना पोलिसांनी डांबले असे समजून परिणामी आंदोलक खवळले. जमावातील काही लोकांनी पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूने जाऊन कागदपत्रे हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सबइन्स्पेक्‍टरने गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यात सहा जण शहीद झाले. त्यामुळे जनतेत तीव्र प्रक्षोभ निर्माण झाला आणि स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी स्वतःला झोकून दिले. यात डॉ. गोविंद मालपे आष्टी, नबाब रसीद खॉं, पेठ, आष्टी, हरिलाल हिरालाल मारवाडी, खडकी, केशवराव श्रावणजी ढोंगे, वडाळा, पंची पोलसू गोंड, वडाळा आणि उदेभानजी डेमाजी कुबडे यांनी प्राणाहुती दिली.

चिमूर येथे 15 ऑगस्टला राष्ट्रीय सेवादलाच्या लहान मुलांनी काढलेली प्रभातफेरी पोलिसांनी अडवली. राष्ट्रसंतांनी हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी काही केले नाही. दुसऱ्या दिवशी नागपंचमीला प्रभातफेरी काढण्यात आली. महाराजांना चंद्रपूरला चातुर्मास कार्यक्रमासाठी जायचे असल्याने ते निघाले तेव्हा आंदोलकांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेव्हा शांततेत सत्याग्रह करा, असे म्हणून महाराजांनी आपल्या गळ्यातील हार तोडून त्यातील फुलांचा जमावावर वर्षाव केला.

जमावाने तो महाराजांचा सत्याग्रहासाठीचा प्रेरणाप्रसाद समजून उत्साहात येऊन डाकबंगल्याकडे मोठ्याने नारे लावत मोर्चा वळवला. तिथे एसडीओ डुंगाजी आणि इन्स्पेक्‍टर जरासंग यांच्याकडे शांततेने कागदपत्रे सुपूर्द करण्याची मागणी केली. ती त्यांनी धुडकावून लावली. संतप्त जमावाने डुंगाजी आणि तहसिलदार सोनवणे यांना जागीच ठार केले. आंदोलकांनी सर्व बंदिस्त नेत्यांना मुक्त केले व सर्व रेकॉर्ड जमावाने जाळून टाकला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही शहीद तर अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी अनेक दिवस सशस्त्र पहारा लावून चिमूर व परिसरातील गावांवर एक लाख रुपयांचा सामुदायिक दंड आकारला आणि तो बळजबरीने वसूलही करण्यात आला.

यावली येथे भारत छोडो आंदोलनाची सुरूवात 15 ऑगस्ट 1942 रोजीच गांधी चौकात झाली होती. प्रथम शाळा, पोस्टाची पेटी फोडली नंतर कोंडवाडा तोडला आणि पाटलांचे दप्तर शांतपणे ताब्यात घेतले. याची वार्ता जिल्ह्याच्या ठिकाणी पोचली. सत्याग्रहींनी लावलेला तिरंगाध्वज, त्याचे रक्षण करणारे तरुण यांच्यावर 18 ऑगस्ट रोजी सर्व तयारीनिशी पोलिस कमिशनरसह आलेल्या पोलिस कुमकेने गोळीबार केला. यात तुळशीराम तडस, रामचंद्र भोजने आदी धारातीर्थी पडले आणि अनेक लोक जखमी झाले. राजाराम औरंगपुरे शहीद झाले. एकूण 30 लोकांना गोळ्या लागल्या. तर 62 लोकांवर खटला भरण्यात आला.

विदर्भातील आष्टी-चिमूर-यावली यासह बेनोडा, वरुड, उत्तमगाव यासारखी गावंसुद्धा महाराजांपासून प्रेरणा घेऊन या स्वातंत्र्य समरात प्राणपणाने उतरली. त्यांनीही स्वातंत्र्य यज्ञात आपली आहुती टाकली आणि भारतीय इतिहासात अजरामर झाले. अशा खेड्यापाड्यांपर्यंत स्वातंत्र्याची ज्वाळा पसरविण्याचे कार्य राष्ट्रसंतांनी केले. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांत आपल्या अमोघ वाणी आणि कृतीने विश्‍वास निर्माण करून त्यांना स्वातंत्र्यसमरात उभे केले. खऱ्या अर्थाने हा लोकलढाच होता. या लढ्याचे कर्णधार त्या-त्या गावातील सामान्य लोकच होते. ही किमया राष्ट्रसंतांनी साधली.
 

loading image