नाग नदी सौंदर्यीकरणाचे "फ्रेंच मॉडेल'

नागपूर : नाग नदी सौंदर्यीकरण विस्तृत आराखड्यात सीताबर्डी येथे असे सौंदर्यीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे.
नागपूर : नाग नदी सौंदर्यीकरण विस्तृत आराखड्यात सीताबर्डी येथे असे सौंदर्यीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे.

नागपूर : नाग नदी सौंदर्यीकरणाचा विस्तृत आराखडा फ्रान्सच्या एएफडीने तयार केला असून महापालिकेने अंमलबजावणी केल्यास शहराच्या आकर्षणात भरच नव्हे तर पर्यटकांचाही कल नागपूरकडे वाढण्याची शक्‍यता आहे. विस्तृत आराखड्यानुसार नाग नदीच्या किनाऱ्यावर आठ ठिकाणी आकर्षक उद्यानांसह सायकल ट्रॅक, आठ पुलांसह किनाऱ्याला लागून असलेल्या जुन्या वास्तूंपर्यंत पोहोचण्यासाठी हेरिटेज वॉक तयार करण्यात येणार आहे.
नाग नदीच्या दोन्ही किनाऱ्यापासून पंधरा मीटर अंतरापर्यंत सौंदर्यीकरणाचा विस्तृत आराखडा नुकताच एएफडीने महापालिका आयुक्तांना सोपविला. संपूर्ण 17 किमी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 1600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, तत्पूर्वी नाग नदीतील सांडपाणी शुद्ध करण्यासाठी नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जपानच्या "जिका' या संस्थेने नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पासाठी 1252 कोटींचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार 60 तर राज्य सरकार 25 टक्के अनुदान देणार आहे. उर्वरित 15 टक्‍क्‍यांची तजवीज महापालिकेला करावी लागणार आहे. प्रदूषण निर्मूलनानंतरच नाग नदी सौंदर्यीकरण प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी आणखी काही काळ जाण्याची शक्‍यता आहे. एएफडीने जगातील विविध नद्यांच्या किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचा अभ्यास करून नाग नदी सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार केला. 17 किमी किनाऱ्यावर आठ ठिकाणी आकर्षक उद्यान तयार करण्यात आले आहे. यात अंबाझरी तलाव परिसर, शंकरनगर चौक, सीताबर्डी, अशोक चौक, सेंट झेव्हियर शाळा, प्रजापतीनगर, पारडी पूल तसेच पारडीतील स्मार्ट सिटीअंतर्गत होऊ घातलेल्या नाग नदी किनाऱ्यावर सौंदर्यीकरणासाठी आकर्षक उद्यान तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नाग नदी किनाऱ्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात सौंदर्यीकरणासाठी महामेट्रोनेही सहकार्याची तयारी दर्शविली आहे. किनाऱ्यावरील संगमेश्‍वर मंदिर, काशीबाई मंदिरापर्यंत हेरिटेज वॉकही तयार केले जाणार आहे. 10 किमीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.
जपानचे पथक 9 जानेवारीला नागपुरात
नाग नदी सौंदर्यीकरण आराखड्याच्या अंमलबजावणीपूर्वी नाग नदी प्रदूषण निर्मूलनाच्या आराखड्यानुसार कामासंबंधी पाहणीकरिता "जिका' या जपानच्या संस्थेचे प्रतिनिधी 9 जानेवारीला नागपुरात येणार आहे. या संपूर्ण पाहणीनंतरच जपान सरकार करार करणार असून प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला प्रारंभ होईल.

प्रदूषण निर्मूलनासाठी जपानचे पथक पाच महिने नागपुरात वास्तव्य करणार आहे. मात्र, दोन महिन्यांमध्येच प्रदूषण निर्मूलनासंबंधीची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. नाग नदी प्रदूषणमुक्त झाल्यानंतर किनारा तसाच दुरवस्थेत राहू नये यासाठी सौंदर्यीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल.
- मोहम्मद इजराईल, तांत्रिक सल्लागार, नदी व सरोवरे, मनपा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com