पत्नीसोबत वाईट संवाद साधल्याच्या रागावरून मित्राचा खून, दोघांना अटक

रूपेश खैरी
Friday, 30 October 2020

अविनाश याने आरोपीच्या पत्नीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून अनैतिक संबंधासाठी मागणी केली. यावरून संतापलेल्या पती व त्याच्या मित्राने कट रचून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली.

वर्धा : मित्राने पत्नीशी अश्लील संवाद साधल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.

अविनाश राजू  फुलझेले (वय ३०), असे मृताचे, तर निखिल प्रभाकर ढोबळे (वय २८), सुधीर ऊर्फ चेतन दिलीप जवादे , असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोनेगाव परिसरात प्रमोद महाजन यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता या आरोपीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शी  दिसत होते. मृताचा चेहरा दगडाने ठेचला असल्याने त्याची ओळख पटविणे शक्य झाले नाही. या हत्या प्रकरणाचा उलगडा करणे पोलिसांसाठी अवघडच झाले होते. 

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरू झाला. यात हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश राजू फुलझेले हा २७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याचे पुढे आले. अविनाशच्या नातेवाईकांना विचारणा करून तपास केला असता मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. या हत्याप्रकरणाचा शोध सुरू असताना विचारपूस करण्यासाठी निखिल ढोबळे व सुधीर उर्फ चेतन जवादे याला ताब्यात घेतले. या दोघांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी हत्येची कबुली दिली. 

अविनाश याने आरोपीच्या पत्नीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून अनैतिक संबंधासाठी मागणी केली. यावरून संतापलेल्या पती व त्याच्या मित्राने कट रचून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली असून ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे हवालदार संतोष दरगुडे, गजानन लामसे, शेख हमीद, रंजीत काकडे, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, राजेश जैसिंगपुरे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, गोपाल बावणकर, मनीष कांबळे, नवनाथ मुंडे, अमोल ढोबळे, प्रदीप वाघ यांनी केली.

हेही वाचा - बामणी प्रोटिन्स कंपनीत रसायनाच्या टाकीत जीव गुदमरून एकाचा मृत्यू, पाच गंभीर

असा रचला कट - 
सुधीर, निखिल आणि अविनाश हे तिघे खास मित्र होते. यातच अविनाशने सुधीर याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत तिच्याशी अश्लील संवाद साधला. ही बाब तिने सुधीर व त्याचा मित्र निखिल या दोघांच्या कानावर टाकली. यातून त्यांनी अविनाशला संपविण्याचा कट रचला. या तिघांनी घटनेच्या दिवशी दारू प्यायली.  यानंतर तिघेही निखिलच्या दुचाकीने सोनेगाव येथील शेतात पोहोचले. येथे दोघांनी मिळून त्याचा खून केला आणि पोबारा केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. 

हेही वाचा - पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच

मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आल्याने या प्रकरणाचा उलगडा लवकर होणे शक्य झाले. दोन्ही आरोपींचा सुगावा लागताच एकाला देवळी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या टाकळी येथून तर दुसऱ्याला हिगणघाट येथून अटक केली. 
- नीलेश ब्राह्मणे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend murder another friend in wardha