फ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागपूर :  सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान "फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण केल्याच्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या अधिनस्थ असलेल्या "भरोसा सेल'कडे देण्यात आला. या प्रकरणाचा तपास पारदर्शी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा संखे या महिला अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन अग्रवाल याच्या सीताबर्डीतील मेन रोडवरील "फ्रेंड्‌स' नावाच्या कपड्याच्या दुकानासोबत शहरातील जवळपास 110 शाळा-महाविद्यालयांचा गणवेशासाठी करार आहे. त्यामुळे अग्रवालच्या दुकानात विद्यार्थिनींची गर्दी राहायची. याच दुकानात ड्रेस खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थिनींना ट्रायल रूममध्ये कपडे बदलताना लपवून ठेवलेला मोबाईल आढळला होता. ही बाब त्या मुलींनी मालक किसन अग्रवाल याच्या लक्षात आणून दिली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे दोन्ही मुलींनी सीताबर्डी पोलिसांना फोन करून तक्रार दिली. पोलिसांनी किसन अग्रवाल आणि नोकर पिंटू ऊर्फ निखिल चोथमल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र, किसन अग्रवाल याला दोन तासांतच पोलिसांनी सोडून दिल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत चर्चा सुरू होती. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलिस आयुक्‍तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या भरोसा सेलकडे सोपविला. आता पारदर्शी तपास होऊन पीडितेला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्‍त करण्यात येत आहे. सीताबर्डी पोलिसांनी कायद्यानुसार अतिशय पारदर्शी तपास केला आहे, त्यामुळे तपासावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया सीताबर्डीचे ठाणेदार जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.
तपास पारदर्शी होणार
फ्रेंड्‌समधील प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिसांकडून काढून आता गुन्हे शाखेच्या भरोसा सेलकडे देण्यात आला. या प्रकरणाचा तपास अतिशय पारदर्शी करण्यात येईल. वरिष्ठांचेही या तपासाकडे लक्ष आहे.
-गजानन राजमाने, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friends' investigation into crime branch