मैत्री, दोस्ती, यारी... दिवसभर "खुमारी'!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नागपूर :  सोशल मीडियाच्या काळात एकमेकांशी क्षणाक्षणाला "टच'मध्ये असलेल्या मित्रांनी आज प्रत्यक्ष भेटीवर भर देत दिवसभर "फ्रेंडशिप डे'चा आनंद लुटला. फ्रेंडशिप बॅंड बांधून परस्परांतील "बॉडिंग' वाढविलेच शिवाय अनेकांच्या हृदयात नव्या मैत्रीचे अंकुरही फुटले. फ्रेंडशिप डेनिमित्त बेधुंद तरुणाई उत्साहात फुटाळा तलावाच्या किनाऱ्यावर चिंब झाली, तर रेस्टॉरंटमध्येही चहाचा घोट घेत किंवा चवदार, लज्जतदार पदार्थांवर ताव मारत जुन्याच मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत मैत्रीचे बंध आणखी घट्ट केले.

नागपूर :  सोशल मीडियाच्या काळात एकमेकांशी क्षणाक्षणाला "टच'मध्ये असलेल्या मित्रांनी आज प्रत्यक्ष भेटीवर भर देत दिवसभर "फ्रेंडशिप डे'चा आनंद लुटला. फ्रेंडशिप बॅंड बांधून परस्परांतील "बॉडिंग' वाढविलेच शिवाय अनेकांच्या हृदयात नव्या मैत्रीचे अंकुरही फुटले. फ्रेंडशिप डेनिमित्त बेधुंद तरुणाई उत्साहात फुटाळा तलावाच्या किनाऱ्यावर चिंब झाली, तर रेस्टॉरंटमध्येही चहाचा घोट घेत किंवा चवदार, लज्जतदार पदार्थांवर ताव मारत जुन्याच मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत मैत्रीचे बंध आणखी घट्ट केले.
कवी, शायर यांनी मैत्रीची विविध रूपे काव्य, शायरीतून उलगडली. तरीही प्रत्येक जण मैत्रीचा वेगवेगळा अनुभव घेतो. आज "फ्रेंडशिप डे'निमित्त शहरात सकाळपासून मित्र, मैत्रिणींनी मित्राजवळ बसून गप्पा करीत जुन्या किस्स्यांना उजाळा दिला. रविवार सुटीचा दिवस असल्याने नोकरीनिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रांत असलेल्या अनेक जुन्या मित्र, मैत्रिणींनी शहराबाहेर फार्म हाउसवर पिकनिकचा किंवा हॉटेलमध्ये जाण्याचा बेत पूर्वसंध्येलाच आखला. सकाळपासून आखलेले बेत यशस्वी करण्यासाठी लगबग होती. आज कॉलेज बंद असले, तरी तरुणाईने सकाळी धावपळ करीत उद्याने गाठली. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप चर्चा रंगल्याचे चित्र उद्यानांत दिसून आले. अंबाझरी उद्यान, दत्तात्रयनगर उद्यान, सक्करदरा तलाव उद्यान, त्रिमूर्तीनगरातील उद्यान, सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. बाबासाहेब उद्यान, लकडगंजमधील बरबटे उद्यानांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसोबतच तरुणाईचीही गर्दी दिसून आली. सकाळपासून सुरू झालेले मैत्रीचे पर्व दुपारी रेस्टॉरंटमध्ये अनेकांनी साजरे केले. पिझ्झा, बर्गर, सॅंडविचवर ताव मारताना एकमेकांची मजा घेत मैत्रीला आणखी घट्ट केले. सायंकाळ होताच तरुणाईने फुटाळा गाठले. त्यामुळे सायंकाळी फुटाळा तलावावर तरुणाईची गर्दी होती. पावसाचा जोरदार शिरवा, मक्‍याचे भाजलेले कणीस आणि गप्पात रंगलेले तरुणाईचे वेगवेगळे ग्रुप, त्यामुळे फुटाळा अनेकांच्या अनुभवाचा साक्षीदार ठरला. हातावर फ्रेंडशिप बॅंड बांधणारे मित्र, गळाभेट घेणारे मित्र, गळ्यात हात टाकून चालणारे मित्र, एकमेकांचे जुने किस्से काढून परस्परांना चिडविणारे मित्र, बेधुंद होऊन मजा घेणारे मित्र, असा वेगवेगळ्या मित्रांचा प्रकार फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव परिसरात सायंकाळी दिसून आला. एकीकडे तरुणाईने फ्रेंडशिप डे साजरा केला, तर निवृत्त ज्येष्ठ नागरिकांनीही एकमेकांना भेटून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त पिकनिकसाठी शहराबाहेर जाणाऱ्यांचीही मोठी संख्या होती. कुणी फार्म हाउसवर तर कुणी वॉटर पार्कला मित्रांसोबत दिवस घालवला.
पोलिसांचा "वॉच'
मैत्रिदिनाचे औचित्य साधून शहरातील फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर, सक्‍करदरा तलावासह बॉटनिकल गार्डन, जपानी गार्डन, महाराजबाग अशा काही मोठ्या उद्यानांमध्ये तसेच परिसरात पोलिसांचा सकाळपासून बंदोबस्त होता. विशेषतः अंबाझरी आणि फुटाळा तलावावर साध्या गणवेशात असलेल्या महिला पोलिसांची गस्त लावण्यात आली होती. टागरट मुले तसेच रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथकाची वाहने दिवसभर फिरत होती. उद्यानांमध्ये अश्‍लील चाळे करू नये म्हणून पोलिस फिरताना दिसत होते. "फ्रेंडशिप डे' असल्याने अनेक हॉटेल्समध्ये "कपल्स'ची गर्दी होती. मात्र, आज कुठेही अनुचित घटना घडली नाही.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friendship day news