फ्रेंड्‌सशिप... लव्ह... सेक्‍स आणि विद्यार्थिनी गर्भवती

अनिल कांबळे
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

अकरावीत असणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यात फेसबुकवरून फ्रेंड्‌सशिप होते... नंतर दोघांत लव्ह होते... त्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. ती दोन महिन्यांची गर्भवती राहते... आईला प्रकार कळतो...आई मुलीसह पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार देते... पोलिस 16 वर्षीय मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करतात... अशा प्रकारे "छोटीसी लव्हस्टोरी'चा दी एंड होतो. हा प्रकार शहरातील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.​

नागपूर- अकरावीत असणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यात फेसबुकवरून फ्रेंड्‌सशिप होते... नंतर दोघांत लव्ह होते... त्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. ती दोन महिन्यांची गर्भवती राहते... आईला प्रकार कळतो...आई मुलीसह पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार देते... पोलिस 16 वर्षीय मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करतात... अशा प्रकारे "छोटीसी लव्हस्टोरी'चा दी एंड होतो. हा प्रकार शहरातील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.

ज्या वयात शिक्षण आणि करिअरकडे वळायचे असते, त्या वयात शारीरिक बदलांमुळे मुलामुलींमध्ये आकर्षण निर्माण होते. नको त्या वयात नको त्या चुका हातून घडतात. त्यामुळे दोघांचेही आयुष्य बरबाद होण्याच्या काठावर असते. मेडिकल परिसरात राहणारी 16 वर्षीय मुलगी निशा (बदललेले नाव) अकरावीत शिकते. तिचे आईवडील फळविक्रेता आहेत. घरातील वातावरण "फ्री' आहे. तर, 16 वर्षांचा संजू (बदललेले नाव) हासुद्धा अकरावीत आहे. त्याला वडील नाहीत. आई गृहिणी आहे. दोघांची फेसबुकवरून ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन व्हॉट्‌सऍपवरून चॅटिंग सुरू केली. काही दिवसांतच दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. 16 सप्टेंबरपूर्वी संजूने निशाला घरी बोलावले. दोघांनीही सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशा प्रकारे त्यांचे संबंध वाढत गेले. त्यातून ती गर्भवती होते. पोट दुखत असल्यामुळे ती आईकडे तक्रार करते. डॉक्‍टरकडे गेल्यानंतर गर्भवती असल्याचे ऐकून आईला धक्‍का बसतो. घरी गेल्यानंतर तिला "इमोशनल ब्लॅकमेल' करून मुलाचे नाव विचारते. त्याला घरी बोलावल्यानंतर तो शारीरिक संबंधाबाबत कबुली देतो. त्यानंतर आई मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचते आणि तक्रार देते. तक्रारीवरून पोलिस संजूविरुद्ध गुन्हा दाखल करतात.

बदनामी आणि शिक्षण बंद 
विधवा असलेल्या संजूच्या आईने मुलाची समजूत घातली. मात्र, तोपर्यंत हातून वेळ निघून गेली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर समाजात होणाऱ्या बदनामीपोटी निशाचे शिक्षण बंद करण्यात आले. तिला घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. नातेवाईक आणि समाजात बदनामी झाल्यामुळे दोघांच्याही आईवडिलावर नामुष्कीची वेळ आली आहे. 

मुलांमध्ये जैवरासायनिक बदल लवकर होत आहेत. त्यांना सायकॉलॉजिकल मॅच्युरिटी उशिरा येते. मुलांच्या लैंगिक वयामध्ये येण्याचे प्रमाण कमी झाले. शारीरिक आकर्षण वाढलेले असते. त्यांच्याशी पालक, शिक्षक किंवा मोठे मनमोकळेपणाने बोलत नाहीत. इंटरनेट, पोर्नोसाइट यांचा अतिवापर वाढला आहे. त्यावरून लैंगिक आकर्षण वाढते. अशा मुलांना केलेल्या कृत्याचे भान नसते, तसेच परिणामाची भीतीसुद्धा नसते. त्यांना शिक्षेची नव्हे, तर समुपदेशनाची गरज आहे. 
-डॉ. राजा आकाश, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Love Sex sexually pregnant case in Nagpur