काय चाललंय वारंवार? म्हाडा कॉलनीसमोर बिअरबार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • नव्याने सुरू होणाऱ्या बारला नागरिकांचा विरोध
  • बिअरबारसमोर महिलांची विरोध प्रदर्शने
  • याअगोदर 2012 मध्ये ग्रामपंचायतने घेतला विरोधाचा ठराव

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : नीलडोह ग्रामपंचायतने परिसरात बार होऊ नये याकरिता वारंवार ठराव घेऊन बारला विरोध केला. यापूर्वी ठराव पारित झाला. परंतु ठरावाला "केराची टोपली' दाखवीत पुन्हा बार सुरू करण्याचे कारस्थान सुरू झाले. म्हाडा कॉलनीसमोर नव्याने सुरू होत असलेल्या बारविरोधात परिसरातील महिला पुन्हा एकवटल्या व त्यांनी बारचा विरोध केला.

 

नागरिक त्रस्त
नीलडोह ग्रामपंचायत अंतर्गत म्हाडा कॉलनीसमोर नव्याने सुरू होत असलेल्या बिअरबारला स्थानिक नागरिकांचा विरोध होत असून बुधवारी (ता. 4) या परिसरातील महिलांसह नागरिकांनी या बारसमोर विरोध प्रदर्शन केले. यावेळी नागरिकांच्या समर्थनार्थ सरपंच वनिता गडमडे, उपसरपंच मनोज सुभेकर, ग्रा. पं. सदस्य प्रविश भाबडा, शुभम दाभे, कल्पना सहारे आदी पदाधिकारी समोर आले. हा बार बंद करण्याची मागणी केली. शिवाय या ग्रामपंचायतमध्ये सन 2012 मध्ये महिला सभा व ग्रामसभा या दोन्ही सभांमध्ये सर्वानुमते या ग्रामपंचायत परिसरात नवीन दारूचे दुकान किंवा बिअरबारला परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव संमत करण्यात आला आहे. असे असताना या नवीन बारला परवानगी कशी मिळाली, हा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. बुधवारी सकाळी 11 वाजता परिसरातील बहुतांश महिला, म्हाडा कॉलनी गाळेधारक सहकारी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या बारसमोर आले. बार बंद करण्यात यावा, अशा घोषणा दिल्या.

परिसरात शाळा व धार्मिक स्थळे
हिंगणा मार्गालगत असलेल्या म्हाडा कॉलनीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या प्लॉट क्र 131/6 वर असलेल्या बिल्डिंगमध्ये नव्याने बिअरबार सुरू होत असल्याची माहिती समोर येताच परिसरातील नागरिकांनी याचा विरोध सुरू केला आहे. या बिल्डिंगच्या बाजूला अंगणवाडी, शाळा व दोन धार्मिक स्थळेसुद्धा आहेत. या बारमालकाने बनावट कागदपत्रे लावून परवानगी मिळविली असून त्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी व हा बार येथून तत्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य, गाळेधारक संस्थेच्या अध्यक्ष उषा शुक्‍ला, सुरेश बोरीकर, शालीक मोटघरे, सुनील काळे, संदीप तालपेकर, चंद्रकांत नायडू, लीलाधर दुबे, मनीषा चेपूरवार, भिकाजी काळणे, लीला लहानगे, पूजा यादव, मीनल टाले, विभा ठाकूर, योजना जाधव, अपर्णा तिवारी, उषा शुक्‍ला, सुवर्णा वासनिक, प्रीती दुधे, रज्जूताई सोनोने, काजल मिश्रा, ज्योती राऊत, रंजना ठाकरे, नलिनी वानखेडे, स्वीटी शर्मा, परमानंद गिरी, अंशू सिंग, नंदू गणवीर यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही तरी हा बार सुरू होत असून याला नागरिकांचा विरोध आहे. हा बार या परिसरात सुरू होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पोलिस आयुक्त, तहसीलदार हिंगणा, ग्रामपंचायत प्रशासन यांना निवेदन देण्यात आले असून या बारविरोधात लढा सुरू राहील, असे
ग्रामपंचायत सदस्य प्रविश भाबडा व शुभम दाभे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In front of the Mhada Colony, "repeatedly 'bearbar