फसवणुक! जेमतेम सातवी पास आणि करतात डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार

मिलिंद उमरे | Thursday, 24 September 2020

अपत्यप्राप्ती, कर्करोग, सिकलसेल अशा अनेक समस्यांवर आपल्याकडेच रामबाण उपाय असल्याचा दावा करतात. आणि उपचार करण्याच्या नावाखाली लोकांची लूट करतात.

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट असून काहीजणांचे जेमतेम सातवीपर्यंतच शिक्षण झालेले असतानासुद्धा ते चक्‍क ऍलोपॅथी औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत. त्यामुळे एक व्यापक मोहीम राबवून या बोगस डॉक्टरांवर पायबंद घालण्याची मागणी होत आहे.

येथून जवळच असलेल्या नवेगाव परिसरात एवढे डॉक्‍टर वाढले की, रुग्ण कमी आणि डॉक्‍टरच जास्त आहेत. विशेष म्हणजे स्वत:ला डॉक्‍टर म्हणवणारे काहीजण फक्त चौथी ते दहावीपर्यंतच शिकलेले आहेत. या परिसरात जवळपास ८ ते १० लोक डॉक्‍टर म्हणून कार्यरत आहेत. हे बोगस डॉक्टर ग्रामीण आदिवासी लोकांना थोडी जरी व्याधी झाली तरी खूप मोठा आजार आहे, असे भासवून त्यांना हजारो रुपयांचा गंडा घालतात.

अपत्यप्राप्ती, कर्करोग, सिकलसेल अशा अनेक समस्यांवर आपल्याकडेच रामबाण उपाय असल्याचा दावा करतात. आणि उपचार करण्याच्या नावाखाली लोकांची लूट करतात. त्यातच कहर म्हणजे, ब्रह्मपुरी, नागपूर येथे यांच्या हस्तकांचे मेडीकल स्टोअर्स आहेत.

हे लोक ज्या रुग्णाकडे जातात त्याच्याकडून भरमसाठ शुल्क वसूल करतातच पण प्रिस्क्रिप्शन लिहून त्याच मेडीकल स्टोअर्समध्ये पाठवतात. या मेडीकलमधून त्यांना ३० टक्‍केपर्यंत कमीशन देण्यात येते, अशी चर्चा आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण नसताना, कोणतीही पदवी नसताना अशा अनेक बोगस डॉक्‍टर्सनी मोठ मोठी घरे बांधली, कार घेतल्या. त्यातच काही लोक जनतेला लुबाडण्यासाठी चष्म्यांच्या विक्रीतही गुंतले आहेत.

हे लोक डोळे तपासून तुम्हाला नंबरचे चष्मा देतात. रुग्णांचा विश्‍वास बसावा म्हणून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांचे खोटे परवानगी पत्रही दाखवितात.

नवेगाव परिसरात ही अशी बोगस डॉक्‍टरकी पिढीजात करण्यात येते. बोलण्यात पारंगत असलेले हे लोक रुग्णांचा विश्‍वास जिंकून त्याच्याकडून उपचाराच्या नावाखाली पैसे लुबाडत असतात. केवळ गोरगरीबच नव्हे, तर सुशिक्षित, अधिकारी, कर्मचारीवर्गसुद्धा यांच्या भूलथापांना बळी पडताना दिसत आहे. हा प्रकार केवळ येथेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाने अशा बोगस डॉक्‍टर्सवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सविस्तर वाचा - मेळघाटात आलाय नवा पाहुणा! पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

कोरोनात उखळ पांढरे
सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच ते घाबरून जातात. त्यांना कोरोना चाचणीचीही भीती वाटते. मग, अशा व्यक्ती बोगस डॉक्‍टर्सकडून उपचार करून घेतात. सध्याच्या कोरोना काळात असे अनेक बोगस डॉक्‍टर्स आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार