सावधान मंडळी, मंगल कार्यालयात, चोरट्यांचे अ"मंगल' कार्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

  • 37 हजारांची रक्‍कम लंपास
  • घटना सीसीटीव्हीत कैद
  • अंबादेवी देवस्थानातून पुजचे पैसे लंपास

टेकाडी/देवलापार (जि.नागपूर) ः चोरटे कुठे "गेम' साधतील, याचा काही "नेम' नाही. कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जय दुर्गा मंगल कार्यालयातून विवाहाच्या कार्यक्रमासाठी दिलेली "बुकिंग'ची रक्कम चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. थडीपवनी येथील अंबादेवी देवस्थानातील दानपेटीतील पैशांवरही चोरट्यांनी डल्ला मारला. पोलिसांनी या घटनेतील आरोपींचा शोध घेणे तातडीने सुरू केले आहे.

तालुक्‍यात सुरू असलेल्या घरफोडींच्या घटनांवर पोलिसांना अंकुश लावण्यात अपयश येत आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू असतो. तोच दुसऱ्या दिवशी नवीन घटनेची नोंद पोलिसांच्या मानगुटीवर बसून तयार असते. अजय बालचंद गुप्ता (वय 34, कांद्री कन्हान) यांचे राष्ट्रीय महामार्गावर जयदुर्गा मंगल कार्यालय आहे. सध्या लग्नसोहळ्याला सुरुवात झालेली असून कार्यालयाच्या "बुकिंग'साठी "ऍडव्हान्स' घेतला जातो. गुप्ता यांनी अशाच एका पार्टीकडून 37 हजार रुपये ऍडव्हान्समध्ये घेऊन ते कार्यालयाच्या काउंटरमध्ये ठेवले. कार्यालयाचे शटर लोटून गुप्ता हे घराकडे निघून गेले. परंतु, आधीच पाहणीवर असलेल्या आरोपीने हीच संधी साधून कार्यालयातीळ रकमेवर हात साफ केला. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. आरोपीचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. त्याने कथ्या रंगाचे जॅकेट घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक महादेव सुरजुसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अवैध कोळसा व्यवसाय आणि मादक पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात खूप वाढले आहे. अशात परिसरात रात्रीबेरात्री गांजा, दारू आणि इतर व्यसनांसाठी गावाभोवतालच्या रिकाम्या भूखंडावर या शौकीन बेरोजगारांचा ठिय्या असतो. अशात रात्रीला मोकाट फिरणाऱ्या युवकांवर कन्हान पोलिसांनी अंकुश लावणे गरजेचे झाले आहे.

थडीपवनीच्या अंबादेवी देवस्थानात चोरी
थडीपवनी ः नरखेड तालुक्‍यातील अंबादेवी देवस्थान नुकतीच चोरी झाली. या अगोदरही इथे चोरीच्या घटना घडल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहेत. सीसीटीव्हीत चोरटा हा अंदाजे तीस वर्षांचा तरुण असून पायात बूट आहेत. तोंडाला कापडाने झाकले असल्याचे दिसते. संस्थासंचालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिस चोरट्यांचा शोध घेण्याच्या कामी लागलेले आहेत. पुढील तपास ठाणेदार डेकाटे, बीट जमादार चलपे व हिवसे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The function of thieves in the wedding hall