अंत्ययात्रा रोखून मृतदेह घेतला ताब्यात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः नंदनवनमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय परिचारिकेचा संशयास्पद मृत्यू झाला. कुटुंबीयांनी घाईघाईत अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्ययात्रा अर्ध्यात पोहोचली असता नंदनवन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतरच अंत्यसंस्कार पार पाडले. हा घटनाक्रम आज रविवारी दुपारी घडला. तृप्ती सिद्धार्थ वंजारी (रा. शिवणकर नगर झोपडपट्टी) असे मृत पावलेल्या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती वंजारी ही नंदनवन परिसरातील शिवणकर झोपडपट्टीत वृद्ध आईवडील आणि बहिणीसह राहत होती. ती एका नामांकित खासगी रुग्णालयात परिचारिका होती. काही दिवसांपासून ती तणावात होती. कुटुंबीयांशी जास्त बोलत नव्हती. एकाकी राहत होती. अशातच ती शनिवारी दुपारी चार वाजता घरात मृतावस्थेत आढळून आली. काही वेळाने कामावरून आई घरी आली असता तिला तृप्ती झोपलेली दिसली. थकली असावी म्हणून झोपल्याचा तिचा समज झाला. त्यामुळे तिला झोपेतून उठविण्याकडे दुर्लक्ष करीत घरकाम करायला लागली. शेवटी तिला चहा घेण्यासाठी उठविले असता तिची हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे आईने शेजाऱ्यांना माहिती दिली. तृप्ती मृत पावल्याचे लक्षात येताच त्यांनी तिची घाईघाईत अंत्यक्रियेची तयारी केली. सायंकाळी तृप्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना एका दक्ष नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अर्ध्यापर्यंत गेलेली अंत्ययात्रा रस्त्यावरच थांबविली. नातेवाइकांशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह थेट शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला. सायंकाळच्या सुमारास मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला. त्यानंतर अंत्यविधी पार पडले.

इंजेक्‍शन घेतल्याचा संशय
मृतदेहाशेजारी रिकामे इंजेक्‍शन दिसून आले. त्यावरून तृप्तीने स्वतःला इंजेक्‍शन टोचून घेत आत्महत्या केल्याची शंका आहे. तृप्तीचा अचानक मृत्यू आणि त्यानंतर अंत्यविधीसाठी कुटुंबीयांनी केलेली घाई यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातूनच पोलिसांपर्यंत घटनेची माहिती पोहोचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com