कामगार रुग्णालयात सलाईनमध्ये बुरशी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कामगार रुग्णालयातील परिचारिकेच्या लक्षात हा प्रकार आला. लगेच संपूर्ण वॉर्डातील या सलाईनचा वापर थांबवला. कोणालाही यामुळे बाधा झाली नाही. सलाईनमध्ये आढळलेला पदार्थ बुरशी आहे की नाही, अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीतून पुढे येईल. कंपनीलाही ताकीद देण्यात येईल. दोषी आढळल्यास कारवाई प्रस्तावित केली जाईल. 
- डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य विमा रुग्णालय, नागपूर. 

नागपूर - कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात उपचारादरम्यान सलाईनमध्ये बुरशीसदृश वस्तू आढळली. 

येथील कामगार विमा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाला सलाईन लावायचे होते. परिचारिकेने सलाईन हाती घेऊन रुग्णाजवळ पोहोचली. परंतु, सलाईनमध्ये पांढरी वस्तू आढळली. बुरशीसदृश वस्तू दिसताच परिचारिकेने तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्या कार्यालयात धाव घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. देशमुख यांनी तत्काळ सलाईनच्या वापरावर थांबा लावला. सर्व सलाईनचा साठा वॉर्डातून तसेच स्टोअर रूममधून बाहेर काढण्याचे निर्देश दिले. सलाईनची बॉटल ही हवाबंद असते. मात्र, रुग्णालयात आणताना बॉटलच्या झाकणाला धक्का लागल्यामुळे छिद्र झाले आणि यामुळे बुरशीसदृश वस्तूने जागा केली असा तर्क लावण्यात आला, अशी माहिती मेडिकल स्टोरमधूनही देण्यात आली. मात्र, स्टोअरमधील साठा परत करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. कामगार रुग्णालयातील सर्व सलाईन अल्बर्ट डेव्हिड कंपनीच्या आहेत. रुग्णालयात 17 मार्च 2017 रोजी कंपनीच्या एकूण 1600 सलाईन बॉटल्स बोलावण्यात आल्या. आता अवघ्या 193 बॉटल्सचा शिल्लक आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये तयार करण्यात आलेल्या या सलाईनच्या बॉटल्स जुलै 2018 मध्ये मुदतबाह्य होतील. परंतु, बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनातर्फे सर्व सलाईन बॉटल्स स्टोअरमधून बाहेर काढण्यात आल्या आहेत. संबंधित कंपनी आणि अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. कंपनीकडून दुसरा स्टॉक मागविण्यात आला आहे. 

Web Title: fungi in saline hospital