भावी डॉक्‍टरने केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला असलेल्या मुलींचे वसतिगृह क्रमांक दोन. मध्यरात्रीची वेळ. अचानक मुलींच्या ओरडण्याचा आवाज झाला. मुलींचे किंचाळणे ऐकून सारेच एका खोलीच्या दिशेने धावले. एमबीबीएसला दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने 20 पेक्षा अधिक गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला असलेल्या मुलींचे वसतिगृह क्रमांक दोन. मध्यरात्रीची वेळ. अचानक मुलींच्या ओरडण्याचा आवाज झाला. मुलींचे किंचाळणे ऐकून सारेच एका खोलीच्या दिशेने धावले. एमबीबीएसला दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने 20 पेक्षा अधिक गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
देवनिधी पाटील असे या 19 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मागील वर्षभरापासून तिला नैराश्‍याने ग्रासले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मागील परीक्षेदरम्यान ताणतणावामुळे उपचार अर्ध्यावरच सोडले असल्याची चर्चा येथे होती. काही दिवसांपासून ती पुन्हा तणावात असल्यानेच बुधवारी मध्यरात्रीनंतर एक वाजताच्या सुमारास पॅरासिटेमॉलच्या 22 गोळ्या एकापाठोपाठ घेतल्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती किंचाळली. बाजूच्या खोलीतील विद्यार्थिनींना वॉर्डनशी संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती दिली. तत्काळ तिला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने ती आता धोक्‍याबाहेर आहे. एका बड्या मंत्र्यांची ती पुतणी असल्याचे सांगितले जाते.
ताणतणाव, जाच कारणीभूत
वैद्यकीय व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण घेत असताना या भावी डॉक्‍टरांमध्ये प्रचंड तणाव असतो. त्यात वरिष्ठांसह शिक्षकांशीही खटके उडतात. त्यातून आत्महत्येचा प्रयत्न विद्यार्थी करतात. मेडिकलध्ये मागील दोन वर्षांचा विचार करता, ही पाचवी घटना आहे. यातील दोघे दगावले आहेत. विभागप्रमुखाच्या जाचाला कंटाळून मार्च 2017 मध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मे 2017 मध्ये यशवंत खोब्रागडे याने मेडिकलच्या लायब्ररीमागे कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. यानंतर 2017 ऑगस्ट मध्ये रोशन शिरसाट या विद्यार्थ्याने वसतिगृह क्रमांक 5 मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याशिवाय अश्विनी राऊत या महिला निवासी डॉक्‍टरनेही गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Future doctor tried suicide