भावी इंजिनिअर, डॉक्‍टरांचे स्वप्न "लॉकडाउन'; फी ट्यूशन क्‍लासेसकडेच पडून 

गणेश राऊत
गुरुवार, 21 मे 2020

गेल्या दशकात खासगी शिकवणी वर्गांना पेव फुटले आहे. विद्यार्थी दहावीत असल्यापासून खासगी शिकवणी वर्गांकडून त्याला सावज म्हणून हेरले जाऊ लागले. पालकही शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना बळी पडताहेत.

यवतमाळ : बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन ज्यांनी इंजिनिअर, डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न बघितले, त्यासाठी लाखो रुपये फी भरून खासगी शिकवणी वर्ग लावले, त्या विद्यार्थ्यांचे स्वप्न कोरोनामुळे "लॉकडाउन' झाल्याचे दिसत आहे. तर, पालकांनी कर्ज काढून, पी.एफ. काढून भरलेले लाखो रुपये मात्र शिकवणी वर्गांकडेच पडून आहेत. अध्ययन व अध्यापन दोन्ही थांबल्यामुळे एका पिढीचे भवितव्यच अधांतरी असल्याचे दिसत आहे. 

गेल्या दशकात खासगी शिकवणी वर्गांना पेव फुटले आहे. विद्यार्थी दहावीत असल्यापासून खासगी शिकवणी वर्गांकडून त्याला सावज म्हणून हेरले जाऊ लागले. पालकही शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना बळी पडताहेत. त्यामुळे शिकवणी वर्गांची फीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली. नियमित व क्रॅश कोर्सही सुरू झाले. नीट, एमएचटी-सीईटी, जेईई मेन व ऍडव्हान्स, आयआयटी इत्यादी स्पर्धा परीक्षांसह बारावी विज्ञानचा क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये फी आकारली जाऊ लागली. नागपूर, अकोला, नांदेड ही शहरे तर खासगी शिकवणी वर्गांचे हब झाले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासासह शिकवणीची व्यवस्था करण्यात आली. पालकांनी फक्त फी भरायचे आणि बिनधास्त राहायचे. आपल्याच क्‍लासला विद्यार्थी मिळावेत म्हणून शिकवणी वर्गांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात. पालक व विद्यार्थी त्या जाहिरातींना बळी पडतात. अनेक पालकांनी आपल्या मुलाला दीड लाख, दोन लाख फी भरून खासगी शिकवणी वर्गांमध्ये टाकले आहे. याठिकाणी प्रवेश देतानाच एकमुस्त दोन्ही वर्षांची फी भरावी लागते. यावर्षी जे विद्यार्थी अकरावीत होते त्यांनी संपूर्ण फी भरूनच प्रवेश घेतला.

अवश्य वाचा-  का घेतली पित्याने मुलीसह विहिरीत उडी? पिता झाला गतप्राण, मुलगी मात्र वाचली

पालकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून कर्ज काढून, पी. एफ. काढून फी भरली. मात्र, यंदा मार्चपासून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन झाले. त्यामुळे शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गसुद्धा बंद झालेत. अनेक परीक्षाही रद्द झाल्या आहेत. सध्या लॉकडाउनचा चवथा टप्पा सुरू आहे. पुढेही लॉकडाउन वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिकवणी वर्गासाठी नागपूर, नांदेड, अकोला गाठलेले विद्यार्थी घरी परतले आहेत. काही क्‍लासेसकडून ऑनलाइन धडे देणे सुरू आहे. तर, काही क्‍लासेसकडून तेसुद्धा सुरू नाहीत. ऑनलाइन कोर्समध्ये विद्यार्थी एकाग्र राहत नाहीत. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी पडली आहे. बारावीचे वर्षे हे जीवनाला कलाटणी देणारे असते. डॉक्‍टर, इंजिनिअर व्हावे म्हणून विद्यार्थीदेखील दोन वर्षे प्रचंड परिश्रम घेत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाने त्यांचे भवितव्यच लॉकडाउन केल्याचे दिसत आहे. 

ग्रामीण भागात जी मुले जेईई, नीटला आहेत ती धास्तावलेली आहेत. त्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे शिकवणी वर्गांकडे अडकले आहेत. कोरानामुळे त्यांचे भवितव्य उद्‌ध्वस्त होत असताना दिसत आहे. त्यामुळे शिकवणी वर्गांनी या विद्यार्थ्यांचे 70 टक्के शुल्क परत करावे. 
-संतोष अरसोड, 
पालक, नेर, जि. यवतमाळ. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Future of engineers, doctors dream of 'lockdown'