ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था

सिरोंचा : दुरवस्थेत असलेली ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक वास्तू.
सिरोंचा : दुरवस्थेत असलेली ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक वास्तू.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची निगा राखण्यात प्रशासनाला काहीच स्वारस्य नसल्याने या वास्तूची पडझड होत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा ब्रिटिशकालीन वारसा जपण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हवामान खात्याचे कार्यालय राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे असले, तरी या खात्याचा कोणताच कर्मचारी सिरोंचा येथे कार्यरत नाही. इंग्रजांच्या राजवटीत या भागातील हवामानाचा संभाव्य अंदाज व पावसाचे मोजमाप करण्यासाठी या वास्तूच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे हे कार्य नियमित सुरू होते. 20 ते 25 वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक महसूल विभागाकडून पर्जन्याची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येत असे. या कामासाठी लिपिकवर्गीय कर्मचारी असायचा. या लिपिकाच्या दैनंदिन व नियमित सेवाकार्यसूचीत या पर्जन्यमापकाचे कामही सोपविले होते. त्याचा अतिरिक्त मोबदलाही देण्यात येत होता. या कामाचे देयक स्थानिक तहसीलदारांच्या शेऱ्याने नागपूरच्या हवामान खात्याला पाठविण्यात येत होते. तिकडून मंजुरी आल्यावरच संबंधित कर्मचाऱ्याला मोबदला अदा करण्यात येत असे. ही मेहनतान्याची रक्‍कम मिळण्यास सहा ते आठ महिने लागत असले, तरी एक कर्तव्य म्हणून कर्मचारी हे काम करायचा. मात्र, कालांतराने ही कर्तव्यभावना लोप पावली.
शिवाय नागपूरच्या हवामान खात्यालाही या ब्रिटिशकालीन वास्तूचा विसर पडला. तहसील कार्यालयाच्या मागे ध्वजस्तंभाजवळ सिरोंचा-आलापल्ली या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कडेला ही सुरेख वास्तू असून तिच्या लाकडी पायऱ्या जीर्ण झाल्या आहेत. एकमेव सागवान दाराची मोडतोड झाली असून ते मोकाट गुरांचे आश्रयस्थान झाले आहे. कधी कधी हौशी युवक व लहान मुले या इमारतीवर चढण्याचा प्रयत्न करतात. चुकून या इमारतीवर चढल्यास मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

नूतनीकरण गरजेचे
ब्रिटिशांच्या काळात सिरोंचाला जिल्ह्याचा दर्जा होता. येथे ब्रिटिशांच्या राजवटीच्या साक्षीदार असलेल्या अनेक इमारती आहेत. 1910-11 मध्ये 11 हजार 338 रुपये खर्च करून सिरोंचा येथे विश्रामगृह बांधण्यात आले होते. हे विश्रामगृह आजही प्रसिद्ध असून या विश्रामगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. त्याचप्रमाणे या ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक वास्तूचे व इतर इमारतींचे नूतनीकरण गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com