भाजप सुडाचे राजकारण करत आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire

भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडून हा पक्षच संपविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

Chandrakant Khaire : भाजप सुडाचे राजकारण करत आहे

गडचिरोली - भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडून हा पक्षच संपविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. इतर प्रादेशिक पक्षांच्या मागे इडी, सीबीआयचा ससेमिरा लावणे, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत भाजप सुडाचे राजकारण करत आहे, असा आरोप करत भाजपचे सुडाचे राजकारण संपवण्यासाठीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवगर्जना अभियान सुरू केले असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवणार अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवार ता. २७) केले.

शिवगर्जना अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गडचिरोली येथे आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावात येऊन काम केले. परंतु त्यामुळे शिवसेना संपणार नाही. भाजप ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकत आहे. त्यामुळे शिवसेनेचा ईव्हीएमला विरोध आहे. यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्या अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली असून सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन ही मागणी लावून धरावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी सुरजागड खाण प्रकल्पावरही भाष्य केले.

वस्तूतः सुरजागड लोहप्रकल्पाची निर्मितीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या स्वाक्षरीने झाली. जिल्ह्यातील आपल्या बेरोजगारांना जिल्ह्यातच रोजगार देण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात आला. मात्र यातून अपेक्षित उद्देश साध्य होताना दिसत नसून भांडवलदारांचे हित जोपासण्याचे व स्थानिकांवर अन्याय करण्याचे कंपनीचे धोरण दिसून येत.

त्यामुळे शिवसेना स्थानिकांना न्याय देण्यासाठी आणि हा उद्योग स्थानिक ठिकाणीच व्हावा, यासाठी उग्र आंदोलन करणार असून युवासेनेचे सहविस्तार प्रमुख तथा धाडस या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी हे गडचिरोलीत येऊन या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना प्रदेश युवा सेना सचिव शरद कोळी, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, संघटक सूरेश साखरे, प्रकाश मारावार, छाया कुंभारे आदी उपस्थित होते.