Gadchiroli Crime News : ७५ हजारांची लाच स्वीकारताना सरपंच अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadchiroli Crime News Sarpanch arrested accepting bribe of 75 thousand

Gadchiroli Crime News : ७५ हजारांची लाच स्वीकारताना सरपंच अटकेत

गडचिरोली : सिमेंट-काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुरगावचा सरपंच मारोती रावजी गेडाम (वय ४५) याला शुक्रवार (ता. १३) रंगेहाथ अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी ग्रामपंचायत मुरगाव अंतर्गत कोकडकसा समाज मंदिर ते साधू पदा यांच्या घरापर्यंतचे सीसी रोडचे बांधकाम पूर्ण केले होते. या रस्त्याच्या बांधकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करून देण्यासाठी मुरगाव ग्रामपंचायतीचा सरपंच मारोती गेडाम याने ९० हजार रुपयांची लाच मागितली.

तडजोडीअंतर्गत पंच साक्षीदारांसमक्ष ७५ हजार रुपयांची लाच गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रस्त्याच्या बाजूला स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सरपंच मारोती गेडाम विरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फाैजदार प्रमोद ढोरे, पोलिस हवालदार नथ्थू धोटे, नायक पोलिस शिपाई राजू पद्मगिरीवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोळे, किशोर जौंजाळकर, पोलिस शिपाई संदीप घोरमोडे, किशोर ठाकूर, संदीप उडाण, महिला पोलिस शिपाई विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, तुळशीराम नवघरे यांनी केली.