गडचिरोलीतील बिनपावसाचा पूर तर ओसरला...मात्र पूरग्रस्तांचे अश्रू झाले अनावर

 गडचिरोली : येथील गडचिरोली-आरमोरी मार्गावर सुरू झालेली वाहतूक.
गडचिरोली : येथील गडचिरोली-आरमोरी मार्गावर सुरू झालेली वाहतूक.

गडचिरोली : गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विक्रमी विसर्गामुळे आभाळातून पावसाचा एक टिपूस पडलेला नसताना जिल्ह्यात आलेला महापूर अखेर बुधवारी (ता. २) पहाटे ओसरला. अनेक मार्ग मोकळे होऊन वाहतुकीसाठी रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला असला; तरी या पुरामुळे नुकसान झालेल्यांच्या डोळ्यांत अश्रू मात्र अद्याप कायम आहेत.

यंदा पहिल्यांदाच आकाशातून अजिबात पाऊस न पडताही महापूर कसा येतो, हे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी "याचि देही याची डोळा' अनुभवले. या पुराचा सर्वाधिक फटका गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तीन तालुक्‍यांना बसला. २८ ऑगस्टपासून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. हा विसर्ग वाढतच गेला.

३० हजार क्‍यूमेक्‍सच्या वर गेलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, खोब्रागडी, कठाणी, पाल, गाढवी, पोहार आदी नद्या तसेच शिवणी, गोविंदपूर, गडअहेरी, वट्रा, शंकरपूर, मार्कंडा, डोकुली, अनखोडा आदी नाल्यांची जलपातळी प्रचंड वाढली. त्यातून अनेक भागांत पूर येऊन कित्येक गावांना पाण्याने वेढले.

१९९४ नंतर पहिल्यांदाच गडचिरोलीत पुराचे पाणी

कठाणी नदीवर उंच पूल झाल्यानंतरही खरपुंडी नाक्‍यापासून पुढे माणूसभर पाणी असल्याने तसेच पुढे पाल नदीचा पूल बुडाल्याने गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद झाला होता. तसेच आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गाला जोडणारा तसेच देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गाला जोडणारा पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे नागपूर मार्ग बंद होता. शिवणी, गोविंदपूर नाल्यामुळे गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद पडला होता. याशिवाय जिल्ह्यातील तब्बल १५ मार्ग पाण्यामुळे बंद झाले होते. १९९४ नंतर पहिल्यांदाच गडचिरोली शहराच्या वेशीत पुराच्या पाण्याने प्रवेश केला.

बुधवारी पहाटेपासून वाहतूक सुरू

गडचिरोलीतील कोटगूल, अडपल्ली, आरमोरी तालुक्‍यातील वघाळा तसेच देसाईगंज तालुक्‍यातील अनेक भागांतील नागरिक पुरात अडकल्याने त्यांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी झाल्यानंतर मंगळवारी (ता. १) सायंकाळी पूर ओसरायला सुरुवात झाली; तरी अनेक मार्ग बंद होते. मात्र, बुधवारी पहाटेपासून मार्ग सुरू झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी अडकून पडलेली वाहनेही रस्त्यावरून धावू लागली.

नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत…

या पुराच्या काळात अनेक ठिकाणी नागरिकांना वीज, पाण्याविना दिवस आणि रात्रही काढावी लागली. देसाईगंज येथील वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. शिवाय पाणीपुरवठा बंद होता. वीज नसल्याने घरातील मोटारचाही वापर पाण्यासाठी नागरिकांना करता आला नाही. गडचिरोली शहराचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. बुधवारी परिस्थिती स्थिरस्थावर होत असली; तरी अनेक नागरिक आता नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com