नक्षल संघटनेत रोडावली महिला माओवाद्यांची संख्या

सुरेश नगराळे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नक्षल संघटनेत महत्त्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या महिलांची संख्या रोडावल्याने माओवादी नेत्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्यातच गडचिरोली पोलिस दलाच्या सी.-60 पथकाने मागील दीड वर्षात तब्बल 17 महिला माओवाद्यांचा खात्मा केल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

गडचिरोली : नक्षल संघटनेत महत्त्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या महिलांची संख्या रोडावल्याने माओवादी नेत्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्यातच गडचिरोली पोलिस दलाच्या सी.-60 पथकाने मागील दीड वर्षात तब्बल 17 महिला माओवाद्यांचा खात्मा केल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
गावपातळीवर नक्षल चळवळीचा प्रचार-प्रसारात महिला नक्षलवाद्यांचा मोठा हातभार आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि महिलांच्या हिताचे प्रश्‍न पुढे करून आदिवासी युवतींना संघटनेत आणण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांच्याद्वारे केली जात होती. एवढेच नाही तर माओवाद्यांच्या नेत्यांच्या सुरक्षेचा भारही त्यांच्यावरच होता. मात्र, गेल्या काही वर्षांत गडचिरोली, छत्तीसगड तसेच तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात राबविलेल्या कोंबीग ऑपरेशनमुळे माओवाद्यांची चांगलीच दमछाक सुरू झाली. नक्षलवाद्यांचा सुरक्षित गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड पहाडाच्या परिसरातही गडचिरोली पोलिसांनी दोनवेळा कारवाई करून नक्षलवाद्यांचे शिबिर उद्‌ध्वस्त केले. यामुळे या भागातील कारवाया थंड झाल्याने माओवाद्यांनी आपला मोर्चा छत्तीसगडमधील घनदाट जंगलाकडे वळविला आहे. मात्र, या साऱ्या समस्येमुळे महिला माओवाद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासनाच्या आत्मसमर्पण योजनेकडे त्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
नक्षलविरोधी अभियान पथकाच्या कारवाईमुळे गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत 28 नक्षलवादी मारल्या गेले. यामध्ये 17 महिलांचा समावेश आहे. या धास्तीने युवतींचे चळवळीबद्दल आकर्षण कमी झाल्याने त्यांनी भरतीकडेही पाठ फिरविल्याचे दिसून येते. नर्मदाअक्का सध्या विभागीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, वय वाढल्याने तिला धावपळ करता येत नाही. तर पेरमिली दलम कमांडर विजयाअक्काने आंध्र प्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. सध्या पोलिसांना मोस्ट वॉंटेड असलेल्या गट्टा नक्षल दलमची उपकमांडर रमकोवर तीन तालुक्‍यांचा भार असल्याने तिची चांगलीच दमछाक होत आहे.
वंदनावर चार लाखांचे बक्षीस
सिरोंचा उपविभागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. यात दोन महिलांचाही समावेश होता. त्यापैकी दोन मृत नक्षल्यांची ओळख घटनेच्या दिवशीच पटली होती तर अन्य एका मृत महिला नक्षलीची ओळख बुधवारी (ता.4) पटली. वंदना कौसी (रा. मांड पाखंजुर) असे तिचे नाव असून ती प्लाटून क्रमांक 14 मध्ये सदस्य होती. तिच्यावर 4 लाख रुपयांचे बक्षीस होते.

Web Title: Gadchiroli female maoist news