माओवाद्यांकडून पंचायत समिती कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

गडचिरोलीः भामरागड पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी लालसू गुंडी आत्राम (वय 36) यांची माओवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. ही घटना रविवारी (ता. 9) मध्यरात्री बेजूर गावात घडली.

तो भामरागड पंचायत समितीत ट्रायसेम योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर हातपंप यांत्रिकी म्हणून मागील दहा वर्षांपासून कार्यरत होता.

मूळचा बेजूर येथील रहिवासी असलेला लालसू आत्राम हा भामरागड येथेच आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. रविवारी बेजूर येथे मक्का जत्रेसाठी तो गेला होता. सायंकाळी जेवण झाल्यानंतर लालसू आपल्या घरी कुटुंबासोबत गप्पा मारत बसला असता तेथे सशस्त्र चार ते पाच माओवादी आले. त्यांनी लालसूला सोबत येण्याचे फर्माण सोडले; मात्र नातेवाइकांनी विरोध केला असताना त्यांनाही धमकी दिली व त्यानंतर त्याला गावाबाहेर घेऊन गेले. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास माओवाद्यांनी त्याच्या तोंडात गोळी घातली. त्यानंतर दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला.

तत्पूर्वी, एका झाडाखाली ठेवलेले त्याचे वाहनही आग लावून पेटवून दिले. हातपंप दुरुस्तीच्या कामासाठी दुर्गम गावात फिरणाऱ्या लालसूची हत्या नेमकी कशासाठी केली, हे समजू शकले नाही. मात्र, पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. या घटनेमुळे दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक त्रस्त आहेत.

Web Title: Gadchiroli: maoist killed Panchayat contract employee