भाजपचे धोरण उद्योगपतीच्या हिताचे : प्रा. अंजली आंबेडकर

गडचिरोली : मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रा. अंजली आंबेडकर.
गडचिरोली : मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रा. अंजली आंबेडकर.

गडचिरोली : भाजप सरकारचे एकही धोरण गरिबांसाठी नसून, केवळ उद्योगपतीच्या हिताचे आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाही. गोरगरिबांच्या जगण्याच्या संघर्षाचे सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा आरोप भारिप-बमसंच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केला.
भारिप-बमसंच्या महिला आघाडीतर्फे गडचिरोली येथे शुक्रवारी (ता. 23) आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माला भजगवळी, राज्य संघटिका रेखा ठाकूर, अरुंधती शिरसाट, प्रा. निशा शेंडे, डॉ. धम्मसंगिनी, डॉ. खुशबू दुर्गे उपस्थित होत्या.
प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या, एकीकडे उज्ज्वला गॅस योजनेद्वारे गरीब महिलांना गॅसचे वाटप केले जात आहे; तर दुसरीकडे सिलिंडरची किंमत एक हजार रुपये झाली आहे. यातून महिलांचे आर्थिक शोषण होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवून मोठ्या कंपन्यांचा फायदा करून दिला आहे. या कंपन्यांनी लोकांच्या श्रमाचे 29 बिलियन रुपये सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी खर्च केले. या पैशाचा योग्य विनियोग झाला असता; तर देशात किमान 5 आयआयटी निर्माण झाल्या असत्या. शेकडो हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणता येऊ शकली असती तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देता आली असती. परंतु, सरकारने असे केले नाही, असा आरोप प्रा. आंबेडकर यांनी केला.
देशातील प्रसारमाध्यमे भांडवलवाद्यांच्या हातात आहेत. या माध्यमांमधून उच्चवर्णीयांची संस्कृती लादली जात आहे. हे हाणून पाडायचे असेल, तर आपण वंचित आहोत, याची जाणीव ठेवावी. शिवाय दलितांनी आदिवासी व ओबीसींना सोबत घेऊन राजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीला प्रा. आंबेडकर यांनी जिल्ह्यात "हमारे गाव में हमारा राज' ही चळवळ चालविणारे समाजसेवक देवाजी तोफा व जनतेचा उमेदवार म्हणून निवडून आलेले ऍड. लालसू नोगोटी यांच्या कार्याचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com